दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबातील सात जणांची कोट्यवधीची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत २२ कोटींपेक्षा अधिक आहे. याआधीही ईडीने इक्बालची संपत्ती जप्त केली असून आतापर्यंत इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांच्या एकूण ७९८ कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी येत्या काही दिवसात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे.

मालमत्ता

मंगळवारी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२’च्या (पीएमएलए) कलम ५ अंतर्गत इक्बाल मिर्चीच्या कुटुंबातील सात सदस्यांची संपत्ती जप्त केली आहे. यात एक सिनेमा थिएटर, मुंबईतील हॉटेल, फार्म हाऊस, मोठा बंगला, थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथील ३ एकरपेक्षा जास्त जागेचा समावेश आहे.

इक्बाल मिर्ची हा डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा साथीदार होता. २०१३ साली इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीतून पैसे उकळण्याचे गुन्हे होते. इक्बाल मिर्चीची लंडन, दुबई आणि मुंबई येथे ३० मालमत्ता तपास यंत्रणांनी शोधून काढल्या. यापैकी दुबईत मिर्चीची सर्वाधिक मालमत्ता आहे.

मालमत्ता

ईडीने गेल्या वर्षी इक्बाल मिर्ची, त्याच्या कुटुंबियाविरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच्या संपत्ती जप्त करायला सुरुवात केली. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ईडीने मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची १५ व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता जप्त केल्या. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती (दुबई) मधील मालमत्तेचा समावेश आहे. त्याची किंमत अंदाजे २०० कोटी इतकी आहे. या प्रकरणात मुंबईचे बांधकाम व्यावसायिक कपिल वाधवान, धीरज वाधवान, हुमायू मर्चंट यांच्यासह एकूण ५ जणांना अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘स्मगलर्स ॲण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स’कडून (एसएएफईएमए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. ही लिलाव प्रक्रिया कोरोनामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. हा दाऊदच्या संपत्तीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव असणार आहे. यातील ६ मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहेत. याआधीदेखील दाऊदच्या राज्यातील विविध भागातील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.

leave a reply