जम्मू-कश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. पुलवामामधील चकमकीत तीन, तर शोपियनमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

पाच दहशतवादी ठार

पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा आणि काकापोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षादलांच्या जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. जवानांनी देखील दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. घटनास्थळावरून दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. यासह तीन एके रायफल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुलवामासह शोपियन जिल्ह्यातील मेलहुरा भागात सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा ठार झाले. या दहशतवाद्यांकडील एके-४७ रायफल व एक पिस्तुल जप्त करण्यातआले आहे. मागील काही महिन्यात सुरक्षादलांच्या जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेमुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहे. यावर्षी आतापर्यंत मोठा संख्येने दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून घुसखोरीच्या घटना रोखण्यात यश आले आहे.

leave a reply