सिरमला ‘स्पुटनिक-व्ही’च्या उत्पादनासाठी डीसीजीआयची मंजुरी

मुंबई – भारतात ‘स्पुटनिक-व्ही’ या कोरोनावरील रशियन लसीचे उत्पादन भारतात वाढणार आहे. डॉ. रेड्डीज बरोबर आता सिरम इन्स्टिट्यूटही ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन घेणार असून शुक्रवारी ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) यासाठी सिरमला परवानगी दिली. हडपसर येथील सिरमच्या प्रकल्पात ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन घेतले जाईल.

‘स्पुटनिक-व्ही’

भारतात आतापर्यंत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 22 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील 99 लाख 11 हजार लसींचे डोस आरोग्य कर्मचार्‍यांना, 1 कोटी 58 लाख डोस फ्रन्टलाईन्स वर्कर्सना, दोन कोटी 25 लाख डोस 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यात आले आहेत. तर 45 ते 60 वयोगटादरम्यानच्या नागरिकांना 6 कोटी 78 लाख आणि 60 वर्षांवरील नागीरकांना 5 कोटी 83 लाख 85 हजार डोस देण्यात आले आहे.

भारतात तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ही तीसरी लाटेचा प्रभाव जास्तीतजास्त लसीकरण करूनच पुर्ण केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींबरोबर आता ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन सुरू होत आहे. तसेच आणखी काही स्वदेशी लसीही लवकरच उपलब्ध होणार आहे. तसेच फायजर, मॉर्डना, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या कंपन्यांनी तयार केलेल्या लसींसाठीही या कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांना लस मिळेल, इतक्या लस उपलब्ध झालेल्या असतील असा सरकारचा दावा आहे.

या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाचा आढावा घेतला व लस फुकट जाण्याच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. लस फुकट जाण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी डीसीजीआयने सिरमला स्पुटनिक व्हीच्या लसींचे उत्पादन घेण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत सिरमने डीसीजीआयकडे अर्ज केला होता. त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली. यामुळे ‘स्पुटनिक-व्ही’ लसींचे उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि आणखी लसी भारतात उपलब्ध होतील. दरम्यान, फायजर ही लस भारतात पहिल्यांदा सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटवर फारशी प्रभावी नसल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

leave a reply