चीनला दशकातील सर्वात मोठ्या ‘सँडस्टॉर्म’ची धडक

बीजिंग – मंगोलियातून ‘गोबी डेझर्ट’मधून आलेले वाळुचे प्रचंड मोठे वादळ चीनला धडकले असून राजधानी बीजिंगसह १२ प्रांतांना त्याचा फटका बसला आहे. मंगोलियात या वादळामुळे सहा जणांचा बळी गेला असून अनेक जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये आलेले हे वादळ दशकातील सर्वात मोठे वादळ असून प्रदूषणाची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणा तसेच प्रसारमाध्यमांनी दिली.

मंगोलियातून वाहणार्‍या वेगवान वार्‍यांनी वाळुचे लोट चीनच्या प्रांतावर आदळले आहेत. वातावरणात धूर व वाळुच्या कणांचे दाट मिश्रण तयार झाले असून राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमध्ये पिवळ्या तसेच नारिंगी रंगाचे धुके दिसून येत आहे. रस्ते, गाड्या तसेच इमारती अस्पष्ट दिसत असून पुढील किमान २४ तास अशीच स्थिती राहू शकते, असे संकेत चिनी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

राजधानी बीजिंगसह ‘सँडस्टॉर्म’चा फटका बसलेल्या चीनमधील प्रांतांमध्ये नागरिकांना खुल्या भागातील कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्‍वसनाचे त्रास व आजार असणार्‍यांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाईसेवेवरही मोठा परिणाम झाला असून हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

बीजिंगमधील नागरिकांनी सोमवारची स्थिती म्हणजे ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ असल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर परदेशी माध्यमांनी चीनमधील स्थितीचे वर्णन ‘अ‍ॅपोकॅलिप्टिक’ असे केले आहे. एका आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी गटाने सोमवारची स्थिती म्हणजे हवामानातील तीव्र बदल व वाळवंटीकरणाचा परिणाम असल्याचा दावाही केला आहे.

leave a reply