आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमधील हिंसाचार रोखण्यासाठी एकजूट करावी

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे आवाहन

एकजूटसंयुक्त राष्ट्रसंघ – लोकनियुक्त सरकार उलथून म्यानमारच्या लष्कराने या देशाची सत्ता हाती घेतल्यानंतर झालेल्या हिंसाचारात १३८ जणांचा बळी गेला आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात ३८ जण ठार झाले असून बळींची संख्या १३८ नाही तर १८३ इतकी असल्याचे काही तटस्थ निरिक्षक सांगत आहेत. तर म्यानमारच्या लष्कराने अटक केलेल्या लोकशाहीवादी कार्यकर्ते आणि निदर्शकांची संख्या दोन हजाराहून अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यांना तुरुंगात डांबून छळ केला जात असल्याच्या धक्कादायक बातम्या उघड होऊ लागल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली असून आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमधील हिंसाचार रोखण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.

एकजूट१ फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या लष्कराने निवडणुकीत विजय मिळविलेल्या नेत्या अँग सॅन स्यू की यांच्या पक्षाचे सरकार उलथले व सत्ता ताब्यात घेतली. निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा दावा करून लष्कराने ही कारवाई केली. तसेच अँग सॅन स्यू की यांच्यावरही लष्कराने आरोप ठेवले आहेत. या विरोधात म्यानमारमध्ये निदर्शने सुरू झाली. सुरूवातीपासूनच शांततेच्या मार्गाने सुरू असलेली निदर्शने मोडून काढण्यासाठी लष्कराने हिंसक कारवाई सुरू केली होती. यानंतरच्या काळातही निदर्शकांनी संयम दाखविला होता. तरीही लष्कराने दडपशाहीचे सत्र सुरू ठेवल्यानंतर, त्यावर आता जहाल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः म्यानमारच्या लष्करावरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखणार्‍या चीनच्या विरोधात जनतेच्या संतापाचा भडका उडाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत म्यानमारच्या लष्कराविरोधातील कारवाई रोखण्यासाठी चीनने नकाराधिकार वापरण्याची धमकी दिली होती. यामुळे म्यानमारच्या लष्करावर कारवाई करणे सुरक्षा परिषदेसाठी अवघड बनल्याचे दिसत आहे. यानंतर म्यानमारच्या खवळलेल्या लोकशाहीवादी निदर्शकांनी चीनला सज्जड इशारा दिला होता. चीनने हा नकाराधिकार वापरला तर म्यानमारची जनता चीनच्या विरोधात आपला नकाराधिकार वापरल्यावाचून राहणार नाही, असा इशारा निदर्शकांनी दिला होता. त्यानंतर रविवारी यांगून शहराजवळील भागात असलेल्या चीनचे कारखाने पेटवून दिले. ही तीव्र निदर्शने रोखण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने गोळीबार केला व यात ३८ जणांचा बळी गेला आहे. यानंतर म्यानमारच्या जनतेमधील चीनविरोधी भावना अधिकच प्रखर बनल्याचे दिसू लागले आहे.

एकजूटरविवारी झालेल्या या हिंसाचाराची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमधील हिंसाचार रोखण्यासाठी एकजूट करावी, असे आवाहन केले आहे. म्यानमारमध्ये निदर्शकांवर गोळीबार केला जात असून आंदोलकांना अवैधरित्या तुरुंगात डांबले जात आहे. तुरुंगात त्यांच्यावर अत्याचारही सुरू आहेत, हे मानवाधिकारांचे धडधडीत उल्लंघन ठरते, असे सांगून गुतेरस यांनी त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मात्र चीनने म्यानमारच्या लष्कराचा बचाव करण्याची भूमिका स्वीकारलेली असताना, हा हिंसाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट दाखवावी व सुरक्षा परिषदेने यासंदर्भात संवादाची प्रक्रिया सुरू करावी, या गुतेरस यांनी केलेल्या आवाहनाचा फारसा प्रभाव पडण्याची अजिबात शक्यता नाही.

म्यानमारचे लोकशाहीवादी नेते जनतेने प्राणपणाने लष्करी राजवटीचा मुकाबला करावा, असे आवाहन करीत आहेत. आपले भवितव्य पणाला लागलेले आहे, हे लक्षात आल्यानंतर म्यानमारची जनताही रस्त्यावर उतरून शक्य त्या मार्गाने लष्करी राजवटीला विरोध करीत आहे. त्याचवेळी हा विरोध मोडून काढण्यासाठी शक्य तितके क्रौर्य प्रदर्शित करण्याचे भयंकर धोरण म्यानमारच्या लष्कराने स्वीकारलेले आहे. त्याचवेळी याची माहिती जगासमोर येऊ नये, यासाठी म्यानमारचे लष्कर धडपड करीत आहे. पण सोशल मीडियावर याचे व्हिडिओज् व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले असून यामुळे म्यानमारच्या लष्कराचा जगभरातून निषेध होत आहे. त्याचवेळी या निर्दयी राजवटीचे पुरस्कार करणारा चीन देखील सोशल मीडियावर तिरस्काराचा विषय बनला आहे.

leave a reply