चीनच्या विस्तारवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर जपान व व्हिएतनाममध्ये संरक्षण सहकार्य करार

संरक्षण सहकार्य करारहनोई/टोकिओ/बीजिंग – चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी जपानने ‘आसियन’ देशांबरोबरील सहकार्य भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जपानने व्हिएतनामबरोबर संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. या कराराअंतर्गत जपान व्हिएतनमाला शस्त्रास्त्रे व संरक्षण तंत्रज्ञान देणार असल्याची माहिती जपानने दिली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी व्हिएतनाम दौर्‍यावर असतानाच जपानचे संरक्षणमंत्री दाखल होणे ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरते.

जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी व्हिएतनामच्या दौर्‍यावर असून यावेळी त्यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह व संरक्षणमंत्री फान वान गिआंग यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये संरक्षणसहकार्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या करारानुसार, जपान व्हिएतनामला शस्त्रास्त्रे व संरक्षण तंत्रज्ञान पुरविणार आहे. त्याचवेळी व्हिएतनामच्या संरक्षणदलांबरोबर संयुक्त सरावाचे आयोजनही करण्यात येणार आहे. जपानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान व्हिएतनामला युद्धनौकांचा पुरवठा करू शकतो. गेल्या वर्षी जपानने व्हिएतनामला सहा गस्तीनौका पुरविण्याचा करार केला होता.

संरक्षण सहकार्य करारचीनकडून गेल्या काही महिन्यात साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी कारवायांना मोठ्या प्रमाणात वेग दिला आहे. साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीवर पूर्ण ताबा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा यामागे आहे. चीनच्या या कारवायांना रोखण्यासाठी जपानने संरक्षणखर्चात वाढ करण्याबरोबरच इतर देशांबरोबर सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. ‘आसियन’ सदस्य देशांना शस्त्रे व संरक्षणसाहित्य पुरविणे त्याचाच भाग मानला जातो.

जपान व व्हिएतनामकडून करारानंतर संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या करारात, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मुक्त वाहतूक व दळणवळण महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले. त्याचवेळी जपानने साऊथ चायना सीमधील एकतर्फी व विस्तारवादी कारवायांवर जोरदार टीकास्त्र सोडले. अशा कारवायांना जपान विरोध करेल, असे जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी बजावले. व्हिएतनामबरोबरील संरक्षणसहकार्य करार हा जपानने ‘आसियन’ देशांबरोबर केलेला तिसरा करार ठरला आहे. यापूर्वी जपानने इंडोनेशिया व फिलिपाईन्सबरोबरही करार केले आहेत.

दरम्यान, चीनची पाणबुडी तसेच विनाशिका जपानच्या दक्षिण बेटांजवळ दिसल्याचा दावा जपानच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. यापूर्वी जपानच्या सेन्काकू बेटांजवळ चीनच्या युद्धनौकांनी सातत्याने घुसखोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या.

leave a reply