पाकिस्तान आणि चीनमध्ये संरक्षण सहकार्य करार

इस्लामाबाद – नेपाळच्या दौर्‍यानंतर चीनचे संरक्षणमंत्री वुई फेंग पाकिस्तानच्या भेटीवर गेले. त्यांच्या या भेटीत दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य करार संपन्न झाला आहे. याचे तपशील दोन्ही देशांनी उघड केलेले नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानची लढाऊ विमाने उड्डाण करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानकडून दाखविल्या जात असलेल्या या आक्रमकतेमागे चीनचे पाठबळ असल्याची चर्चा सुरू आहे. अशा काळात भारताच्या दोन्ही शेजारी देशांनी केलेला संरक्षण सहकार्य करार लक्षवेधी ठरतो.

संरक्षण सहकार्य करार

लडाखच्या एलएसीवर भारतीय लष्कराने सर्वच आघाड्यांवर मुखभंग करणारे प्रत्युत्तर दिल्यानंतर, चीन भारतावरील दडपण वाढविण्यासाठी शक्य ते सारे मार्ग वापरण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानसह नेपाळसारख्या देशमार्फत भारताच्या इतर सीमेवर तणाव माजविण्याचा प्रयत्न चीनने करून पाहिला खरा. मात्र सुरूवातीला चीनच्या चिथावणीने भारताबरोबर सीमावाद छेडण्याची तयारी करणार्‍या नेपाळने, चीनच्या नेपाळमधील घुसखोरीनंतर आपली चूक सुधारली. गेल्या काही दिवसांपासून भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चे प्रमुख, त्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे आणि त्याला काही दिवस उलटत नाही तोच भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी नेपाळचा दौरा केला होता. याने अस्वस्थ झालेल्या चीनचे संरक्षणमंत्री वुई फेंग यांनी नेपाळमध्ये धाव घेतली होती.

नेपाळच्या या दौर्‍यानंतर फेंग वुई यांनी पाकिस्तानला भेट दिली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याबरोबरील वुई फेंग यांच्या चर्चेत उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्याचा मुद्दा अग्रस्थानी होता. वुई फेंग यांच्या या दौर्‍यात उभय देशांमध्ये करार झाल्याचेही सांगितले जाते. या कराराचे तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. मात्र चीनच्या संरक्षणमंत्र्यांची ही पाकिस्तान भेट सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. याच्या काही दिवस आधी पाकिस्तानची लढाऊ विमाने काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळून उड्डाण करीत असल्याचे समोर आले होते.

भारताच्या विरोधात पाकिस्तानला उभे करण्याचा चीनचा प्रयत्न आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून चीनने या प्रयत्नांना वेग दिल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. विशेषतः गिलगिट-बाल्टिस्तानला आपला अंतरिम प्रांत घोषित करून भारताला आव्हान देण्याचा निर्णय पाकिस्तानने चीनच्या सांगण्यावरून घेतल्याचे पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांनी म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा पाकिस्तानचा भूभाग नसून वादग्रस्त भूभाग असेल, तर या ठिकाणी ‘सीपीईसी’ प्रकल्पाद्वारे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक चीन कशी काय करू शकतो? असा सवाल चीनने केला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारला गिलगिट-बाल्टिस्तानबाबत हा निर्णय घ्यावा लागल्याचे दावे काही पाकिस्तानी पत्रकारांनी देखील केले होते.

याद्वारे चीनने पाकिस्तान आणि भारतामध्ये संघर्ष पेटविण्याची तयारी केल्याचे पाश्‍चिमात्य विश्‍लेषक सांगत आहेत. भारत लवकरच आपल्यावर हल्ला चढविणार असल्याचा समज पाकिस्तानने करून घेतला आहे. भारतात दहशतवाद्यांनी घातपात घडविल्यानंतर, पाकिस्तानवर हल्ला चढवून भारत त्याला प्रत्युत्तर देईल, या भीतीने पाकिस्तान गारठून गेला आहे. तरीही दहशतवादी कारवाया सोडून देण्याचा विचार पाकिस्तानने सोडलेला नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानला चीनचे सहकार्य अपेक्षित आहे व चीन भारताच्या विरोधात आपल्याला नक्कीच सहकार्य करील, असे दावे पाकिस्तानात केले जातात. संरक्षण सहकार्य करार करून चीनने या पाकिस्तानला दिलासा दिल्याचे दिसत आहे. मात्र पाकिस्तान व चीन यांची हातमिळवणी गृहीत धरून भारताने लष्करी डावपेच आखले आहे व भारतीय संरक्षणदलांकडून पाकिस्तानसह चीनला याची वेळोवेळी जाणीव करून दिली जात आहे.

भारतीय संरक्षणदलांच्या युद्धसज्जतेमुळेच चीन वेगवेगळ्या मार्गाने भारतावर दडपण वाढविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे चीनच्या पाकिस्तानबरोबरील संरक्षण सहकार्य कराराचा भारताच्या पाकिस्तान किंवा चीनबाबतच्या धोरण व डावपेचांवर विशेष परिणाम होणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply