येत्या काही आठवड्यात अमेरिकेत कोरोनाची साथ धोकादायकरित्या वाढेल

- वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

कोरोनाची साथवॉशिंग्टन – अमेरिकेत येत्या दोन तीन आठवड्यांमध्ये कोरोनाची साथ धोकादायकरित्या वाढताना दिसणार आहे, असा गंभीर इशारा वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फॉसी यांनी दिला. अमेरिकेत नुकत्याच साजर्‍या झालेल्या ‘थँक्सगिव्हिंग फेस्टिव्हल’च्या पार्श्‍वभूमीवर लाखो नागरिकांनी केलेला प्रवास हे त्याचे मुख्य कारण असल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकेतील बहुतांश हॉस्पिटल्स सध्या ९५ टक्क्यांपर्यंत भरली असून दाखल झालेल्या रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना साथीची दुसरी लाट आल्याचे उघड झाले आहे. अमेरिका, युरोप, आशिया व आफ्रिका खंडातील बहुतांश देशांमध्ये साथीची दुसरी लाट सुरू झाली असून रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे. युरोप खंडातील प्रमुख देशांसह अनेक देशांनी नव्या लॉकडाऊनचीही घोषणा केली असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तो कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेत विविध राज्यांच्या प्रशासनांनी मर्यादित स्तरावर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे.

कोरोनाची साथ

गेल्याच आठवड्यात झालेल्या ‘थँक्सगिव्हिंग फेस्टिव्हल’पूर्वी अमेरिकी यंत्रणांनी देशातील जनतेने प्रवास टाळावा, असे आवाहन केले होते. मात्र तरीही लाखो नागरिकांनी हवाईमार्गे प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये सातत्याने कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत राहतील, असे डॉक्टर फॉसी यांनी बजावले. ‘अमेरिकेतील जनतेला घाबरविणे हा आपला हेतू नाही, मात्र हेच वास्तव असणार आहे’, या शब्दात त्यांनी पुढील धोक्याची जाणीव करून दिली.

अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ३२ लाखांवर गेली असून, दोन लाख ६६ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेत २४ तासांच्या अवधीत तब्बल दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहितीही समोर आली होती.

leave a reply