‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल’चे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

- अमेरिका, रशियानंतरचा भारत तिसरा देश ठरला

हैदराबाद – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हैदराबाद येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेल्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल’चे उद्घाटन केले. हायपरसॉनिक विमाने, क्षेपणास्त्र, इंजिनाच्या चाचण्यासाठी ही ‘हायपरसॉनिक विंड टनेल’ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. देशी बनावटीची अशी सुविधा विकसित करणार भारत हा अमेरिका अणि रशियानंतरचा जगातील तिसरा देश बनला आहे. यावेळी ‘डीआरडीओ’च्या संशोधकांनी भारताला ‘लष्करी महासत्ता’ बनवावे, असे आवाहन राजनाथ सिंग यांनी केले. याद्वारे भारत महासत्ता बनेल, असे संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले.

राजनाथ सिंग हैदराबादच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हैदराबाद येथील डीआरडीओच्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्सला भेट दिली. यावेळी संरक्षणराज्यमंत्री जी. कीशन रेड्डीही उपस्थित होते. या भेटीत डीआरडीओ विकसित करीत असलेल्या संरक्षण तंत्रज्ञानाची पाहणी संरक्षणमंत्र्यांनी केली. ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचीही पाहणीही राजनाथ सिंग यांच्याकडून करण्यात आली.

यावेळी डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या ‘हायपरसॉनिक विंड टनेल’चे उद्घाटन राजनाथ सिंग यांनी केले. हा भव्य टनेल भविष्यातील हायपरसॉनिक क्षेपणास्त्र, विमाने आणि इंजिनांच्या चाचण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. येथील या ‘हायपरसॉनिक विंड टनेल’ची व्याप्ती पाहता अशा प्रकरची सुविधा निर्माण करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतरचा तिसरा देश ठरला आहे.

यावेळी संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओच्या संशोधकांबरोबर संवाद साधला. भारताला लष्करी महासत्ता बनविण्याचे आवाहन राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या संशोधकांना केले. यामुळे भारत भविष्यात महासत्ता बनेल, असे राजनाथ म्हणाले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओच्या तरुण संशोधकांचे कौतूक केले. डीआरडीओने पुढील पिढीतील अत्याधुुनिक आवश्यकतांकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. यामध्ये सायबर सुरक्षा, अंतराळ आणि आर्टिफीशिअल इंटिलिजन्सचा (एआय) विचार प्रामुख्याने व्हावा, असे राजनाथ सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, दहा दिवसांपूर्वीच ‘डीआरडीओ’ने ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ (क्यूकेडी) या तंत्रज्ञानाच्या आधारे हैदराबादमधील आपल्या दोन प्रयोगशाळांमध्ये संपर्क प्रस्थापित केला होता.

leave a reply