संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखच्या एलएसीवरील सज्जतेचा आढावा घेणार

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीचा वाद चर्चेद्वारे सोडविण्याचे भारत व चीनने मान्य केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र लडाखच्या एलएसीवर भारत अतिशय सावध असून इथल्या घडामोडींवर भारतीय लष्कराची नजर रोखलेली असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रविवारी लडाखच्या एलएसीला भेट देणार असून इथल्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांची ही लडाखच्या एलएसीवरील भेट म्हणजे चीनला भारताने दिलेला आणखी एक इशारा असल्याचे स्पष्ट होत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखच्या एलएसीवरील सज्जतेचा आढावा घेणारभारत आणि चीनमध्ये लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची नवी फेरी सुरू होईल. या चर्चेच्या आधीच एलएसीवरचा तणाव कमी करण्याची जबाबदारी चीनवरच आहे, याची जाणीव परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली होती. लडाखच्या एलएसीवरील काही भागांमध्ये अजूनही चीनचे जवान तैनात आहेत. ही तैनाती मागे घेण्याचे चीनने लिखित स्वरुपात मान्य केले होते, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली. त्यावर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी घुसखोरी रोखण्यासाठी ही तैनाती असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

यामुळे चीन लडाखच्या एलएसीजवळील तैनाती मागे घेण्यास तयार नसल्याचे उघड होत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून चीनला वेगवेगळ्या मार्गाने समज दिली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एकाच दिवसापूर्वी कोची येथे बोलताना गलवानच्या संघर्षानंतर नौदलाने आघाडीवर तैनाती करून चीनला संदेश दिल्याचे स्पष्ट केले होते. याद्वारे भारतीय नौदलाने आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केल्याचे संकेत संरक्षणमंत्र्यांनी दिले. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल नरवणे हिमाचल प्रदेशच्या भेटीवर असून त्यांनी इथल्या एलएसीच्या सुरक्षेचा आढावा घेतला. लष्कर एलएसीवर अतिशय सावध असून इथल्या घडामोडीवर लष्कराची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव लष्करप्रमुखांनी करून दिली.

या दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लेह व लडाखच्या दौर्‍यावर जाणार असल्याची बातमी आली आहे. रविवारपासून सुरू होणारा हा दौरा तीन दिवसांचा असेल व ते या दौर्‍यात लष्कराची युद्धसज्जता आणि इतर सुरक्षाविषयक गोष्टींची पाहणी करणार आहेत. तसेच या दौर्‍यात संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते एलएसीजवळील क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जाते. संरक्षमंत्र्यांची ही भेट म्हणजे चीनला दिलेला आणखी एक इशारा असल्याचे समोर येत आहे.

leave a reply