अणुकरारात परतण्याची वेळ इराणच्या हातून निसटत आहे

- अमेरिका व फ्रान्सचा इशारा

परिस – लवकरच अशी वेळ येईल, जिथून अणुकरारात परतणे अवघड बनेल. आत्तापर्यंत तशी वेळ आलेली नाही, पण याच दिवशी ती वेळ येईल, हे मी सांगू शकत नाही. मात्र इराणसाठी अणुकरारात परण्याची वेळ निसटत चालली आहे’, असा इशारा अमेरिका आणि फ्रान्सने दिला. त्याचबरोबर अणुकराराच्या मुद्द्यावर अमेरिका आणि इराणमध्ये गंभीर मतभेद असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. इराणचे राष्ट्राध्यक्ष घोषित इब्राहिम राईसी यांनी अणुकराराबाबत केलेल्या घोषणेनंतर अमेरिका आणि फ्रान्सने हा इशारा दिला आहे.

अणुकरारात परतण्याची वेळ इराणच्या हातून निसटत आहे - अमेरिका व फ्रान्सचा इशाराअमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेण्याची तयारी केल्याची घोषणा इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी म्हटले होते. पण इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या मर्जीतील राईसी यांनी सत्तासूत्रे हाती घेताच अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना इशारा दिला. इराणचे हित साधणार असेल तरच अणुकरारावर चर्चा करू, असे सांगून अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे राईसी यांनी बजावले होते. त्याचबरोबर क्षेपणास्त्रनिर्मिती आणि आखातातील इराणसमर्थक शियापंथिय गटांना असलेले समर्थन यापुढेही सुरू राहिल, असे राईसी यांनी ठणकावले. जहालमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या इराणचे भावी राष्ट्राध्यक्ष राईसी यांनी या घोषणेद्वारे अमेरिका आणि युरोपिय देशांना धमकावल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनी केले होते.

शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन आणि फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-येस ले द्रियान यांच्यात झालेल्या बैठकीत इराणच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला सज्जड शब्दात इशारा दिला. इराणने अणुकरारात परतण्याची वेळ निघून जात असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी सांगितले. त्याचबरोबर इराणच्या सेंट्रिफ्यूजेसच्या वाढत्या संख्येवरही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. इराण अशाचप्रकारे सेंट्रिफ्यूजेसवर काम करीत राहिला, युरेनियमचे संवर्धन वाढवले तर इराण ‘ब्रेकआऊट टाईम’ जवळ पोहोचेल. असे झाले तर इराण अणुबाम्बनिर्मितीची क्षमता प्राप्त करण्याचा धोका वाढेल, असा इशारा ब्लिंकन यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबरच्या अणुकरारासाठी अजुनही अनुकूल असून त्यासाठी इराणने अणुकरारातील नियमांचे पालन करायला हवे, असे ब्लिंकन यांनी स्पष्ट केले.

इराणने युरेनियचे संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेसची निर्मिती अणुकराराच्या मर्यादेत करावी. तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना अणुप्रकल्पाच्या सर्वेक्षणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडून केली जात आहे. पण अणुऊर्जा आयोग, अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांच्या मागण्यांप्रमाणे इराण आपल्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमात बदल करणार नसल्याचे इराणच्या नव्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तर इराणबरोबर अणुकरार करणे धोकादायक ठरेल, असे इस्रायल अमेरिकेला सातत्याने बजावत आहे.

leave a reply