संरक्षणमंत्र्यांकडून उपग्रहभेदी ‘मिशन शक्ती’च्या मॉडेलचे अनावरण

नवी दिल्ली – अंतराळातील उपग्रहाला भेदून भारताच्या संरक्षण सामर्थ्याचे प्रदर्शन घडविणार्‍या ‘मिशन शक्ती’ क्षेपणास्त्राच्या मॉडेलचे सोमवारी अनावरण करण्यात आले. राजधानी नवी दिल्ली येथील ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) भवनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचे अनावरण झाले. या क्षेपणास्त्र यंत्रणेकडे संरक्षण तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. भारताच्या सीमेवरील तणाव वाढलेला असताना, उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या मॉडेलचे अनावरण करुन भारताने चीनला योग्य तो संदेश दिल्याचे दिसत आहे.

‘मिशन शक्ती’

सोमवारी ‘डीआरडीओ’ भवनच्या आवारात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष सतीश रेड्डी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ‘मिशन शक्ती’ मोहिमेत वापरल्या गेलेल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची नक्कल ‘डीआरडीओ’ भवनात उभारण्यात आली आहे. भविष्यात अशा आणखीन आव्हानात्मक मोहिमा आयोजित करण्यासाठी ‘डीआरडीओ’तील शास्त्रज्ञांना तसेच तरुणांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला. ‘मिशन शक्ती’च्या यशस्वी चाचणीमुळे अंतराळतील आपल्या संपत्तीचे रक्षण करण्याची क्षमता असलेला भारत जगातील चौथा देश बनला.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘डीआरडीओ’ने ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ‘लो अर्थ आर्बिट’मध्ये (लिओ) भ्रमण करीत असलेल्या वेगवान उपग्रहाला अचूकतेने लक्ष्य करुन भारतीय यंत्रणांनी आपल्या लष्करी तंत्रज्ञानविषयक सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले होते. ही अत्यंत गुंतागुंतीची चाचणी होती आणि भारतीय यंत्रणेने अचूकतेने व अत्यंत वेगात क्षेपणास्त्राद्वारे अंतराळातील उपग्रह लक्ष्य केला होता. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची निर्मिती व चाचणी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारीत होती. या चाचणीबरोबर जटिल आणि गंभीर मोहीम राबविण्याची क्षमता भारताने दाखवून दिली होती.

गेल्या दोन महिन्यांमध्ये भारताने आपल्या संरक्षण सामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन केले आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्राबरोबर रुद्रम, स्मार्ट, एचएसटीडीव्ही, अग्नी, नाग या क्षेपणास्त्रांची चाचणी करुन तसेच त्यांच्या क्षमतेत वाढ करुन भारताने आपल्या शेजारी देशांना इशारा दिल्याचा दावा केला जातो. या क्षेपणास्त्र चाचण्यांबरोबर भारतीय वायुसेनेच्या हवाई कसरती व सागरी क्षेत्रातील नौदलाचा सराव चीनच्या टीकेचे लक्ष्य ठरला आहे. अशा परिस्थितीत, ‘मिशन शक्ती’च्या मॉडेलचे अनावरण करुन भारतीय संरक्षण यंत्रणांनी संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply