छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षादलाच्या कारवाईत चार माओवादी ठार

बिजापूर – सोमवारी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षादलाने दिली आहे. या चकमकीत सुरक्षादलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, देशातील माओवाद उखडण्यासाठी नवी योजना आखण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दल, गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

माओवादी ठार

छत्तीसगडच्या पामेड भागातील जंगलात सीआरपीएफची ‘कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन’ (कोब्रा) सोमवारी गस्त घालत होती. त्यावेळी अचानक माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. सुरक्षादलांनीही माओवाद्यांच्या या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक बराच वेळ सुरू होती. या चकमकीत सुरक्षादलाने चार माओवाद्यांना ठार केले, तर ‘सीआरपीएफ’चे दोन जवान जखमी झाले. माओवाद्यांचे साथीदार जंगलात पळून जाण्यास यशस्वी ठरले असून, त्यांना पकडण्यासाठी मोहिम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या दोन आठवड्यात झालेला माओवाद्यांचा हा सहावा हल्ला आहे.

दरम्यान, देशातील माओवाद्यांची समस्येवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी गृह मंत्रालय नवी योजना आखण्याच्या तयारीत आहेत. यासाठी गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यात माओवाद्यांची समस्या कायमची नष्ट करण्यात नक्की काय अडचणी आहेत, यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत बिहार, झारखंड व महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात आक्रमक मोहीम राबवून माओवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती ‘सीआरपीएफ’च्या एका अधिकाऱ्याने दिली.

नोव्हेंबर २०२०पासून जून २०२१पर्यंत ‘प्रहार-३’ नावाने मोहीम राबविण्याची योजना आखली जात आहे. मात्र मोहीम नक्की कधी सुरु होईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

leave a reply