दिल्ली पोलिसांनी अडीच हजार कोटींचे अमली पदार्थ पकडले

  • अफगाणी नागरिकासह चार जणांना अटक
  • ‘नार्को टेररीझम’च्या दृष्टीने तपास

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त केले आहे. पोलिसांनी 2500 कोटी रुपयांचे अमली पदार्थ या कारवाईदरम्यान जप्त केले. दिल्लीत अमली पदार्थ तस्करीविरोधात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई ठरते, असे दावे करण्यात येत आहेत. भारतातही या अमली पदार्थ व्यापार करणार्‍या या टोळीचे जाळे विविध राज्यात पसरले आहे, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. तसेच या प्रकरणाचा पोलीस ‘नार्को टेररीझम’च्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.

अमली पदार्थदिल्ली पोलिसांनी 283 किलो हेरॉईनसह एकूण 350 किलोचे अमली पदार्थ निरनिराळ्या छाप्यात पकडले आहेत. पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच हजार कोटी रुपये आहे. दिल्ली पोलीस गेल्या काही महिन्यापासून या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीवर नजर ठेवून होते. या ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांकडून या टोळीविषयी माहिती जमा केली जात होती, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

या टोळीकडून भारतात हेरॉईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी विविध मार्गांचा वापर केला जात होता. अफगाणिस्तानातून इराण आणि तेथून समुद्री मार्गाने भारतीय किनार्‍यावर हे अमली पदार्थ उतरविले जात होते. मुंबई बंदराचा यासाठी वापर केला जात असल्याचे लक्षात आले आहे. इतर मालाच्या आडून भारतात आणण्यात येणारे हे अमली पदार्थ कंटेनरमधून दिल्ली, मध्य प्रदेशच्या शिवपूरीमध्ये पोहोचविले जात असतं. येेथे एका फॅक्टरीमध्ये त्यावर प्रोसेसिंग केले जात असे, अशी माहितीही समोर आली आहे.

त्यानंतर हे अमली पदार्थ भारतात विविध राज्यात पोहोचविले जात. पंजाबमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. या अमली पदार्थांवर प्रक्रियेसाठी लागणार्‍या रसायनांचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. एक काश्मिरी व्यक्ती अमली पदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ही रसायने पुरवायचा अशी माहितीही उघड झाली आहे. तसेच पाकिस्तानातूनही पैसे पाठविण्यात आल्याचे काही पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे आता या अमली पदार्थ तस्करी रॅकेटकडे ‘नार्को टेररीझम’च्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

अमली पदार्थभारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी काश्मीर व इतर राज्यात दहशतवाद्यांना अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणारे पैसे पुरविले जातात. यासाठी अमली पदार्थांची तस्करी केली जाते व यातूनच मिळणारा पैसा दहशतवादी व फुटीर कारवायांसाठी वापरला जातो. जम्मू-काश्मीर, पंजाबसह इतर ठिकाणीही नार्को टेररिझमशी निगडीत याआधीही काही प्रकरणे समोर आली आहेत.

पोलिसांनी पकडलेल्या चार जणांपैकी तिघांना हरियाणातून तर एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. यातील एक जण अफगाणी नागरिक आहे. तसेच पकडण्यात आलेल्यांमध्ये एक मूळचा पंजाबचा आणि एक काश्मीरचा असल्याची दिल्ली पोलिसांनी दिली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) दिल्लीत डार्कनेट आणि ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून चालणारे अमली पदार्थांचे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले होते. 22 लाख सायकोट्रोपिक गोळ्या एनसीबीकडून या कारवाईत जप्त करण्यात आल्या होत्या. भारतात विविध राज्यांबरोबर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फिलिपाईन्समध्येही सायकोट्रोपिक गोळ्या नशेबाजीसाठी पुरविल्या जात होत्या.

तर आठवडाभरापूर्वी मुंबईतील जेएनपीटी बंदरात डायरक्टोरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) आणि सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 879 कोटींचे हेरॉईन पकडण्यात आले होते. हे अमली पदार्थही अफगाणिस्तानातून इराणमार्गे जहाजातून तुरटी व टाल्कम पावडरच्या आयातीच्या आडून आणण्यात आले होते. भारतात अमली पदार्थांची तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले असून भारतीय नौदल व तटरक्षकदलांनीही भारतीय समुद्री क्षेत्रात कारवाई करीत गेल्या आठ महिन्यात सुमारे आठ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या निरनिराळ्या तस्करीच्या प्रकरणातही पाकिस्तानशी संबंध दिसून आला होता. तर या अमली पदार्थांबरोबर शस्त्रेही जप्त करण्यात आली होती.

leave a reply