पाकिस्तान अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेची गॅरंटी देणार नाही

- पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याचा दावा

इस्लामाबाद – ‘अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रिया पाकिस्तानने सुरू करून दिली. मात्र अफगाणिस्तानातील या शांतीप्रक्रियेची गॅरंटी पाकिस्तान देऊ शकत नाही’, असे जाहीर करून या देशाने पुन्हा एकदा आपले खरे रंग दाखवून दिले. पाकिस्तानी लष्कराच्या ‘डायरेक्टर जनरल इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे (डीजीआयएसपीआर) मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हा इशारा दिला आहे. त्यांचा हा इशारा प्रसिद्ध होण्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यात अफगाणिस्तानचा मुद्दा होता व यावरून ब्लिंकन यांनी पाकिस्तानला कडक शब्दात समज दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर काही तासात पाकिस्तानने अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेची ‘गॅरंटी’ देण्यास नकार दिला, ही लक्षवेधी बाब ठरते.

पाकिस्तान अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेची गॅरंटी देणार नाही - पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याचा दावाअफगाणिस्तानच्या लष्कराबरोबरील संघर्षात तालिबानची सरशी होत असून या देशाच्या सुमारे 85 टक्के भूभागावर आपण ताबा घेतल्याचा दावा तालिबान करीत आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या हाती कधी पडतो, याची कित्येक वर्षांपासून प्रतिक्षा पाकिस्तान करीत होता. मात्र तालिबान अफगाणिस्तानात करीत असलेल्या रक्तपाताची जबाबदारी आता थेट पाकिस्तानवर येत आहे. कारण पाकिस्तानचा पाठिंबा व सहकार्य याखेरीज तालिबान युद्धात टिकू शकणार नाही, असा अफगाणिस्तानचा आरोप आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानला सहकार्य करणार्‍या पाकिस्तानला थेट शब्दात इशारा दिला होता. तसेच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गनी व उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी अमेरिकेचा दौरा करून पाकिस्तानच्या या कारवायांची सारी माहिती अमेरिकेला पुरविल्याचे सांगितले जाते.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडे लष्करी तळांची मागणी केली होती. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्याला जाहीररित्या नकार दिला. अशारितीने अमेरिकेला दिलेला नकार जाहीर करून पाकिस्तानचे पंतप्रधान बाणेदारपणा दाखवित असले, तरी त्याचे भयंकर परिणाम लवकरच देशाला भोगावे लागतील, अशी चिंता पाकिस्तानचे विश्‍लेषक व पत्रकार व्यक्त करीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून याचीच जाणीव करून दिल्याचे दिसते.पाकिस्तान अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेची गॅरंटी देणार नाही - पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याचा दावा

या चर्चेत परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानातील हिंसाचारासाठी तालिबानला पाकिस्तानने सहाय्य करू नये, असे बजावल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. मात्र या चर्चेच्या बातमीनंतर पाकिस्तानी लष्कराच्या ‘डीजीआयएसपीआर’ जनरल मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी अफगाणिस्तानबाबत लक्षवेधी विधान केले. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रिया सुरू करून दिली, मात्र त्याची गॅरंटी पाकिस्तान देऊ शकत नाही, असे मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले आहेत.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विश्‍लेषक पाकिस्तान अफगाणिस्तानात कधीही शांतता प्रस्थापित होऊ देणार नाही, असे दावे करीत आले आहेत. अफगाणिस्तानातील स्थैर्य प्रस्थापित झाल्यानंतर पाकिस्तानात अस्थैर्य माजेल, अशी चिंता या देशाला सतावत आहे. म्हणूनच तालिबानचा वापर करून शक्य तितक्या प्रमाणावर पाकिस्तानला अफगाणिस्तानात अस्थैर्य माजवायचे आहे. याच कारणामुळे पाकिस्तान अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेची गॅरंटी द्यायला तयार नाही. याची जबाबदारी नाकारून पाकिस्तान यापुढे अफगाणिस्तानात जे काही होईल, त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे जगजाहीर करीत आहे.

leave a reply