महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे चिंता वाढल्या

‘डेल्टा प्लस’मुंबई – कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपासून म्यूटेशन झालेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने चिंता वाढल्या आहेत. जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या नमून्यांपैकी सात नमूने हे डेल्टा प्लस व्हेरियंटचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड तसेच शेजारील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यावर चिंता व्यक्त करण्यात येत असताना ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटच्या संक्रमणाची बाब समोर आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. सध्या राज्यात दिवसाला १० हजार पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत आणि राज्यातील पॉझिटिव्ह दर हा ५.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. असे असले तर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्ण संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही. राज्यात सर्वाधिक रुग्ण याच जिल्ह्यांमध्ये आढळत आहेत.

राज्याचा पॉझिटीव्ह दर हा ५.८ टक्के असताना रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर १३.७ टक्के आहे. या पार्श्‍वभमूमीवर महाराष्ट्रातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यांमध्ये सात नमूने हे डेल्टा प्लस व्हेरियंटचे आढळले आहेत. यातील पाच नमूने हे रत्नागिरी जिल्ह्यातील, तर एक नवी मुंबई व एक पालघर जिल्ह्यातील आहे. यामुळे आता या व आजूबाजूच्या जिल्ह्यातून आणखी काही नमूने जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंट किती प्रमाणात पसरला आहे किंवा संक्रमणाचे प्रमाण किती आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी काही नमूने आता जिनोम सिक्वेन्स तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

‘डेल्टा प्लस’कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची ज्या रुग्णांना लागण झाल्याचे जिनोम तपासणीत समोर आले, ते रुग्ण राहत असलेल्या गाव व परिसराला कन्टेंमेट झोन तयार करण्यात आल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे यातील दोन रुग्णांना कोणत्याही स्वरुपाची लक्षणे दिसत नव्हती. बी.१.६१८.२ हा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट म्यूटेट होऊन अर्थात त्यामध्ये बदल होऊन के४१७एन हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. त्यालाच डेल्टा प्लस असे संबोधण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात डेल्टा प्लसचे जास्त रुग्ण अद्याप देशात आढळलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी यावर फारशी चिंता करण्याची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले होते. मात्र त्याचवेळी हा व्हेरियंट मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेललाही दाद देत नसल्याचे व त्यामुळे हा व्हेरियंट डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याबाबत नीति आयोगाचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल यांनी सावध केले होते. म्हणून नियम न पाळल्यास परिस्थिती पुन्हा बिघडू शकते, असा इशारा पॉल यांनी दिला होता.

विविध तज्ज्ञांकडून तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ब्रिटनमध्ये तिसरी लाट आली असून यामध्ये सर्वाधिक संक्रमण डेल्टा व्हेरियंटमुळे होत आहे. डेल्टा प्लसचे रुग्णही जगभरात विविध देशात आढळले आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात होत असलेल्या डेल्टा प्लसच्या संक्रमणाने चिंता वाढल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळविले नाही, तर तिसरी लाट येण्यास फार वेळ लागणार नाही, असे आधीच तज्ज्ञांनी सावध केले आहे.

leave a reply