वुहान लॅब लीकची माहिती देऊन अमेरिकेत आश्रय घेणार्‍या डॉंग जिंगवुई यांच्यामुळे चीनची राजवट कोसळेल

- विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा निष्कर्ष

वॉशिंग्टन – डॉंग जिंगवुई या चीनच्या गुप्तचर विभागात अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकार्‍याने अमेरिकेत आश्रय घेतल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. जिंगवुई यांनीच कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याची माहिती अमेरिकेला पुरविल्याचे दावे केले जातात. त्यामुळे जिंगवुई यांचा अमेरिकेतील आश्रय ही सर्वसाधारण घटना ठरत नाही, त्याचे धक्कादायक परिणाम नजिकच्या काळात समोर येतील, असे विख्यात स्तंभलेखक आणि चीनविषयक अभ्यासक गॉर्डन चँग यांनी म्हटले आहे. डॉंग जिंगवुई यांच्या गौप्यस्फोटामुळे चीनची कम्युनिस्ट राजवट कोसळू शकते, असा खळबळ माजविणारा निष्कर्ष गॉर्डन चँग यांनी नोंदविला आहे.

वुहान लॅब लीकची माहिती देऊन अमेरिकेत आश्रय घेणार्‍या डॉंग जिंगवुई यांच्यामुळे चीनची राजवट कोसळेल - विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा निष्कर्षएका अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना गॉर्डन चँग यांनी हा दावा केला. चीनच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे उपमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या डॉंग जिंगवुई यांनी हॉंगकॉंगमधून अमेरिकेत पळ काढला. आपल्या लेकीला घेऊन ते फेब्रुवारी महिन्यातच अमेरिकेला पोहोचले होते. सध्या त्यांची अमेरिकेच्या ‘डिफेन्स मिलिटरी इंटेलिजन्स-डीएमआय’कडून चौकशी सुरू आहे. अमेरिकेच्या इतर तपास व गुप्तचर संस्थांमध्ये चीनच्या मिनिस्ट्री ऑफ स्टेटने घुसखोरी केलेली आहे व यामुळे डॉंग जिंगवुई डीएमआयकडे आपल्याकडी माहिती देत असावे. कारण डीएमआय दुसर्‍या कुठल्याही तपास अथवा गुप्तचर संस्थेला आपल्याकडील माहिती पुरवित नाही, असा लक्षवेधी दावा गॉर्डन चँग यांनी केला आहे.

अमेरिकेत चीन मोठ्या प्रमाणात हेरगिरी करीत आहे. चिनी हेरांचे जाळेच अमेरिकेत पसरलेले आहे. अमेरिकेच्या सरकारी विभागांमध्येही चीनचे हेर मोठ्या प्रमाणात आहेत, असे सांगून गॉर्डन चँग यांनी चीनवर गंभीर आरोप केले आहेत. आजवर चीन शेजारी देशांना धमकावणारा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध होता. यामुळे जगाचा चीनकडे पाहण्याची दृष्टीकोन फारसा बदलेला नव्हता. पण कोरोनाचा विषाणू म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच आहे, या माहितीला जिंगवुई यांच्याकडून दुजोरा मिळाला, तर मात्र सारे जग चीनकडे वेगळ्या नजरेने पाहिल. ३८ लाख जणांचा बळी घेणारी कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध होते, हे जिंगवुई यांच्यामुळे जगासमोर आल्यानंतर जगभरात चीनच्या विरोधात तिरस्कार व संतापाची तीव्र लाट उसळेल. जैविक युद्धाच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करून चीनच्या लष्कराने जैविक युद्धाची तयारी केली होती, हे उघड झाल्यानंतर बायडेन प्रशासनाला आपली चीनविषयक भूमिका बदलावीच लागेल, याकडे चँग यांनी लक्ष वेधले.वुहान लॅब लीकची माहिती देऊन अमेरिकेत आश्रय घेणार्‍या डॉंग जिंगवुई यांच्यामुळे चीनची राजवट कोसळेल - विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा निष्कर्ष

ही साथ पसरविण्याचे कारस्थान राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या आदेशानेच करण्यात आले, हे स्पष्ट झाल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला जिंनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदावरून खाली खेचावेच लागेल. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षातील मतभेद तीव्र होऊन चीनची राजवटच कोसळण्याची दाट शक्यता आहे, असा निष्कर्ष गॉर्डन चँग यांनी नोंदविला आहे.

दरम्यान, डॉंग जिंगवुई यांच्याबाबत आलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या असून ते चीनमध्येच असल्याचा दावा हॉंगकॉंगमधील एका दैनिकाने केला होता. तसेच जिंगवुई यांनी चीनमधील परदेशी हस्तकांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहितीही या दैनिकाने प्रसिद्ध केली होती. पण आपण हे दावे स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगून गॉर्डन चँग यांनी चीनची अस्वस्थताच बरेच काही दाखवून देत असल्याचा टोला लगावला.

leave a reply