शतकभरापासून अमेरिका कमकुवत करण्याचे डेमोक्रॅटस्‌‍चे कारस्थान

सिनेटर टॉम कॉटन यांचा आरोप

Obama-Biden-Clintonवॉशिंग्टन – ‘अमेरिकेतील डेमोक्रॅट पार्टी गेल्या १०० वर्षांपासून अमेरिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामागे त्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत नसून हा एका नियोजनबद्ध कटाचा भाग आहे व आता त्याचे परिणाम समोर दिसू लागले आहेत’, असा खळबळजनक आरोप अमेरिकी सिनेटर टॉम कॉटन यांनी केला. डेमोक्रॅट पक्षाचा हा कट दांभिक डाव्या विचारसरणीच्या प्रभावाचा भाग असून ‘क्रिटिकल रेस थिअरी’, ‘ट्रान्सजेंडर आयडॉलॉजी’, अंमली पदार्थांचा मुक्त वापर, वाढती गुन्हेगारी तसेच अफगाणिस्तानमधील माघार या गोष्टी त्याचीच फळे आहेत, असे कॉटन यांनी बजावले.

GOP Senator Tom Cottonअर्कान्सस प्रांतातील सिनेटर असणाऱ्या टॉम कॉटन यांनी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डेमोक्रॅट पक्ष व दांभिक डाव्या विचारसरणीमुळे अमेरिकेचे होणारे नुकसान याकडे लक्ष वेधले. ‘अफगाणिस्तानमधील माघारीनंतर तालिबानसारख्या मध्ययुगीन क्रूरकर्म्यांकडून अमेरिकेला पराभव का पत्करावा लागला? असे प्रश्न आपल्याला सातत्याने विचारण्यात येत होते. त्याचे उत्तर शोधताना आपले लक्ष देशांतर्गत पातळीवर होणाऱ्या घटनांकडेही गेले. त्यातून लक्षात आले की याचे मूळ डाव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावात आहे. यावर विचार करतानाच आपल्याला सर्व गोष्टी पुस्तकाच्या रुपात मांडण्याची प्रेरणा मिळाली’, असे सिनेटर कॉटन यांनी सांगितले. टॉम कॉटन यांनी ‘ओन्ली द स्ट्राँग – रिव्हर्सिंग द लेफ्टस्‌‍ प्लॉट टू सॅबोटेज अमेरिकन पॉवर’ या पुस्तकातून डेमोक्रॅट पक्षाच्या व्यापक कटाचे वर्णन केले असून तो उधळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचाही उल्लेख केला. ‘२०२० साली डाव्या विचारसरणीतील कट्टर गटांनी अमेरिकेच्या रस्त्यांवर धुडगूस घालून जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन व उलिसेस ग्रँट यांच्यासारख्या नायकांचे पुतळे उद्ध्वस्त केले.

Democrats plotअमेरिकेतील शाळांमधून क्रिटिकल रेस थिअरी व ट्रान्सजेंडर आयडॉलॉजी शिकविण्यात येत आहे. अमेरिकी लष्करालाही माओवादी विचारसरणीचे धडे देऊन लष्कराचे खच्चीकरण करण्यात येत आहे. ही सर्व अधोगती डेमोक्रॅट पक्षाच्या ढिसाळ कारभारामुळे झाल्याचे अमेरिकी जनतेला वाटते. पण या गोष्टी अपघाताने घडलेल्या नाहीत तर जाणूनबुजून घडविण्यात आल्या आहेत. अमेरिकेची अधोगती ही एका योजनेनुसार घडवून आणलेली अधोगती आहे’, असा गंभीर ठपका रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर कॉटन यांनी ठेवला. अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाला देशाच्या हिताबाबत कधीच आस्था नव्हती. हा पक्ष त्याबद्दल कायम द्विधा मनस्थितीत असल्याप्रमाणे निर्णय घेत होता, असा आरोपही टॉम कॉटन यांनी केला. अमेरिकेचे लष्करी वर्चस्व, सार्वभौमत्त्व, अंतर्गत सुरक्षा व समृद्ध अर्थव्यवस्था आणि एकंदरीतच अमेरिकेचे जागतिक स्तरावरील वर्चस्व याबाबत डेमोक्रॅट पक्षाची भूमिका कायम द्वेषपूर्ण व अमेरिकेच्या विरोधातील होती, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी गेल्या शतकातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या धोरणांकडे लक्ष वेधले. विल्सन यांनी अमेरिकेची घटना व मूल्यांनाच आव्हान दिले होते, असे कॉटन यांनी सांगितले. विल्सन यांनी आणलेला ‘सेडिशन ॲक्ट ऑफ १९१८’ याचे ठळक उदाहरण ठरते, असा दावाही त्यांनी केला.

माजी राष्ट्राध्यक्ष विल्सन यांच्या काळापासून सुरू झालेल्या योजनेला काहीसे उशिरा पण सध्याच्या काळात यश मिळताना दिसत असल्याची जाणीव सिनेटर कॉटन यांनी करून दिली. १९६० व १९७०च्या दशकात अमेरिकेत उदयास आलेल्या ‘न्यू लेफ्ट’ विचारसरणीने अमेरिकेचे अस्तित्व व प्रभाव नाकारण्याची योजना पुढे नेल्याचा दावाही कॉटन यांनी केला. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा येणे हा याच योजनेतील भाग असल्याचेही म्हटले आहे. गेल्या शतकातील बिल क्लिंटन व त्यानंतर बराक ओबामा आणि ज्यो बायडेन यांची धोरणे अमेरिकेला अधोगतीकडे नेण्यासाठीच असल्याचा आरोपही टॉम कॉटन यांनी केला आहे.

leave a reply