युएनमधील इस्रायलविरोधी ठरावावर अमेरिकेचे टीकास्त्र

Linda Thomasन्यूयॉर्क – इस्रायलने आपल्याकडील अण्वस्त्रांची विल्हेवाट लावावी आणि आपले अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षणाखाली खुले करावे, असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये बहुमताने संमत झाला. पण राष्ट्रसंघामधील या ठरावावर इस्रायलसह अमेरिकेनेही ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रसंघाने इस्रायलविरोधी ठराव मंजूर करणे थांबवावे, अशी टीका अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी केली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील ‘फर्स्ट कमिटी’च्या बैठकीत आखातातील आण्विक प्रसारामुळे निर्माण होणारा धोका, यावर ठराव मांडण्यात आला. इस्रायल छुप्यारितीने अण्वस्त्रांची निर्मिती करीत असल्याचा आरोप या ठरावात करण्यात आला होता. सदर ठराव १५२-५ अशा मोठ्या फरकाने संमत झाला. अमेरिका, कॅनडा, मायक्रोनेशिया, पलाऊ आणि इस्रायल यांनी सदर ठरावाच्या विरोधात मतदान केले. राष्ट्रसंघातील या ठरावावर इस्रायलने आक्षेप घेतला आहे.

हा ठराव इस्रायलला लक्ष्य करणारा असून इराणला मोकळे रान देणारा असल्याची टीका इस्रायलने केली आहे. गेल्या काही दशकांपासून इराण अवैध अणुकार्यक्रम राबवित असून इराणकडे मोठ्या संख्येने संवर्धित आण्विक साहित्याचा साठा असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला. तर राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत ग्रीनफिल्ड यांनी सदर ठराव इस्रायलविरोधी असल्याची टीका केली. इस्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये शांती प्रस्थापित करण्याऐवजी राष्ट्रसंघ इस्रायलविरोधी ठराव पारित करण्यावर लक्ष केंद्रीत करीत असल्याचा आरोप ग्रीनफिल्ड यांनी केला.

leave a reply