हिंदी महासागर क्षेत्रानजिक चीनच्या ड्रोन पाणबुड्यांची तैनाती

नवी दिल्ली/बीजिंग – लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमधील चर्चेची नववी फेरी लवकरच सुरू होईल. यासंदर्भात दोन्ही देशांची बोलणी सुरू असल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. याबाबतची बातमी येत असतानाच, चीनने हिंदी महासागर क्षेत्राजवळ ड्रोन पाणबुड्या तैनात करून इथली शक्य तितकी गोपनीय माहिती मिळविण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर भारताची नजर रोखलेली आहे, असे काही आठवड्यांपूर्वी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते.

इंडोनेशियातील एका मच्छिमाराने आपल्या सागरी क्षेत्रात चीनच्या ‘युयुव्ही-अनमॅन्ड अंडरवॉटर व्हिकल’चे फोटोग्राफ्स घेतले होते. ही चीनची मानवरहित पाणबुडी असावी असा संशय व्यक्त केला जातो. हा ड्रोन पाणबुडीचा प्रकार असून चीनने विकसित केलेल्या ‘सी किंग’ सागरी ड्रोन्सचा भाग असावा, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

चीनने याची तैनाती हिंदी महासागर क्षेत्रात केली आहे. सागरी क्षेत्रातील माहितीचे संकलन करण्यासाठी व संशोधनासाठी ही तैनाती असल्याचे दावे चीनकडून केले जातात. पण प्रत्यक्षात याद्वारे चीन आपल्याला सामरिकदृष्ट्या आवश्यक असलेली माहिती मिळवित असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

विशेषतः आपल्या पाणबुडींचा वापर करण्याच्या आधी त्या क्षेत्रातील सारी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी चीन या ड्रोन पाणबुडींचा वापर करीत असावा, असा दाट संशय व्यक्त केला जातो. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या चीन भारताबरोबर सलोखा प्रस्थापित करण्याबाबत गंभीर नसल्याचे दाखवून देत आहेत. भारताबरोबरील एलएसीवर मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती करूनही चीन भारतावर दडपण टाकण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. उलट या क्षेत्रातील भारताची स्थिती चीनपेक्षा खूपच मजबूत असल्याचे जगभरातील सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. म्हणूनच भारताच्या सागरी क्षेत्रानजिक हालचाली वाढवून चीन भारतावर कुरघोडीच्या प्रयत्नात असल्याचे यामुळे समोर येत आहे.

आजवर चीन भारतावर दडपण टाकण्यासाठी एलएसीवर घुसखोरीचे प्रयत्न करीत आला आहे. यामध्ये भारताला गुंतवून ठेवण्याची योजना चीनने आखली होती. पण प्रत्यक्षात चीनची खरी महत्त्वाकांक्षा हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या वर्चस्वाला आव्हान देणे हीच आहे. हे क्षेत्र आपल्या वर्चस्वाखाली असावे, हा चीनचा हेतू असून याद्वारे चीन आपले सामरिक हेतू साध्य करू शकतो, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. मात्र भारतीय नौदलाकडे चीनला टक्कर देण्याची क्षमता आहे आणि या क्षेत्रातील आपल्या कारवाया भारत कधीही खपवून घेणार नाही, याचीही चीनला पुरेपूर जाणीव आहे.

म्हणूनच चीन सागरी संशोधनाची मोहीम किंवा चाचेगिरीविरोधातील मोहिमेचे कारण पुढे करून हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या हालचालींमध्ये वाढत करीत आहे. भारताने चीनच्या या कारवायांची गंभीर दखल?घेतलेली आहे. काही आठवड्यांपूर्वी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी हिंदी महासागर क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख देशांमध्ये स्पर्धा पेटलेली आहे, असे सूचक विधान केले होते. तसेच भारत या सागरी क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी सावध असल्याचेही जनरल रावत पुढे म्हणाले होते. त्याच्याही पुढे जाऊन नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यांनी चीनचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज असल्याचे जाहीर केले होते.

सागरी क्षेत्रात भारताच्या सुरक्षेला असलेला आव्हानांची पुरेपूर कल्पना भारतीय नौदलाला आहे आणि याला तोंड देण्याची संपूर्ण सिद्धता भारतीय नौदलान केलेली आहे, असे अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यांनी महिनाभरापूर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या या कुरापतींची जाणीव भारतीय नौदलाला फार आधीपासून झाली असल्याचे संकेत मिळाले होते. चीन अशा कुरापती काढत असताना, भारतीय नौदलाने अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियन नौदलांसोबत संयुक्त युद्धसरावात सहभाग घेतला होता. ही चीनच्या चिंतेत भर घालणारी बाब ठरली होती. त्याचवेळी साऊथ चायना सी क्षेत्रात व्हिएतनामच्या नौदलाबरोबर भारतीय नौदलाचा युद्धसराव ही चीनसाठी इशाराघंटा असल्याचे मानले जाते.

leave a reply