‘ध्रुवास्त्र’ वायुसेनेत दाखल होण्यासाठी सज्ज

- अंतिम चाचण्या पूर्ण

नवी दिल्ली/पोखरण – राजस्थानच्या पोखरणमध्ये ‘ध्रुवास्त्र’ या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राच्या एकाच दिवशी चार चाचण्या घेण्यात आल्या. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ मधून घेण्यात आलेल्या या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत, अशी माहिती भारतीय संरक्षण व संशोधन संस्थेने (डीआरडीओ) दिली. या चार चाचण्यांबरोबर ‘ध्रुवास्त्र’ चाचण्या पूर्ण झाल्या असून हे क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच दाखल होईल, असे वृत्त आहे.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेली अ‍ॅन्टी टँक गायडेड मिसाईल (एटीजीएम) ‘नाग’ आधीपासून लष्करात दाखल आहे. या क्षेपणास्त्रांना हेलिना या नावानेही संबोधले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली 1990 च्या दशकात लष्करासाठी ‘नाग’ क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. 2019 साली ही क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात दाखल झाली. नाग क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रत्यक्षात ही क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात दाखल करून घेण्यास उशीर लागला असला, तरी आता डीआरडीओने काळानुरुप त्यामध्ये आवश्यक बदल केले आहेत. तसेच आता या क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टर्समधून डागता येणारी आवृत्तीही संरक्षणदलांच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.

लष्करात दाखल असलेल्या नाग क्षेपणास्त्रांची मारक क्षमता चार किलोमीटर आहे. तर या क्षेपणास्त्रांची हेलिकॉप्टर्समधून डागता येऊ शकणारी आवृत्ती ‘ध्रुवास्त्र’ची मारक क्षमता 7 ते 10 किलोमीटर इतकी आहे. तसेच हे क्षेपणास्त्र ताशी 828 किलोमीटर इतक्या वेगाने आपल्या लक्ष्याचा वेध घेते. जगातील अत्याधुनिक रणगाडाभेदी क्षेपणास्त्र म्हणून ही क्षेपणास्त्र ओळखली जातात. ‘ध्रुवास्त्र’ दिवसा किंवा रात्री, तसेच कोणत्याही वातारणात आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतात, अशी माहिती डीआरडीओने दिली.

पोखरणच्या वळवंटात ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्समधून घेण्यात आलेल्या चार चाचण्यांमध्ये या क्षेपणास्त्रांनी आपल्या लक्ष्याचा वेध अचूकपणे घेतला. चाचण्यांमध्ये या क्षेपणास्त्रांनी आपली क्षमता सिद्ध केल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. या चाचण्या लष्कर आणि वायुसेनेसाठी घेण्यात आल्या. वायुसेनेच्या ताफ्यातील ध्रुव हेलिकॉप्टर्सवर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. तसेच लष्कराच्या ताफ्यातील ध्रुव हेलिकॉप्टर्सवरही ही क्षेपणास्त्र तैनात होतील. यामुळे दुर्गम भागातही शत्रूच्या रणगाड्यांना व चिलखती वाहनांना सहज लक्ष्य करता येईल. नुकत्याच झालेल्या या चाचण्यांबरोबर ‘ध्रुवास्त्र’च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वायुसेनेतही ही क्षेपणास्त्र दाखल होण्यास सज्ज झाल्याचे वृत्त आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओने लष्कर आणि वायुसेनेसाठी घेतलेल्या चाचण्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

leave a reply