नासाचे ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ मंगळाच्या पृष्ठभागावर दाखल

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळसंस्थेकडून प्रक्षेपित करण्यात आलेले ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या दाखल झाले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास हे रोव्हर उतरल्याचे नासाने जाहीर केले. गेल्या 10 दिवसातील ही तिसरी मंगळ मोहीम असून यापूर्वी संयुक्त अरब अमिरात (युएई) व चीनचे यानही मंगळाच्या संशोधनासाठी दाखल झाले आहे. नासाच्या ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ मोहिमेत भारतीय वंशाच्या स्वाती मोहन या संशोधिकेने महत्त्वाचे योगदान दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या सात महिन्यात तब्बल 47 कोटींहून अधिक किलोमीटर्सचा प्रवास करून ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ मंगळावर दाखल झाले आहे. या रोव्हरबरोबर प्रथमच नासाने एक हेलिकॉप्टरही पाठविले असून त्याचे नाव ‘इनजेन्युइटी’ असे ठेवण्यात आले आहे. रोव्हर ज्या भागात जाऊ शकणार नाही, त्या भागाची भौगोलिक माहिती मिळविण्याची जबाबदारी या हेलिकॉप्टरवर आहे. मंगळ ग्रहावर एका हेलिकॉप्टरने मोहीम राबविण्याची ही पहिलीच वेळ ठरते.

रोव्हरवर दोन प्रगत कॅमेरे, लेझर इमेजर, लेझर स्कॅनर, रडार, एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, वेदर सेन्सर, एक्स्पलोरेशन टेक्नॉलॉजी एक्सपरिमेंट अशा विविध यंत्रणांचा समावेश आहे. हे रोव्हर जवळपास दोन वर्षे मंगळाच्या पृष्ठभागावर संशोधन करणार आहे. यातील ‘जेझिरो क्रेटर’चा अभ्यास मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मंगळावरील या पृष्ठभागात पूर्वी तलाव होता, असे मानले जात असून या भागात जीवसृष्टिशी निगडीत दुवे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नासाने ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ मोहिमेसाठी सुमारे 2.75 अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याचे सांगण्यात येते.

मंगळाच्या पृष्ठभागावर नासाने रोव्हर उतरविण्याची गेल्या दशकभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ऑगस्ट 2012 मध्ये नासाने ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविले होते. सध्या जगातील पाच वेगवेगळ्या देशांच्या 10 मोहिमा मंगळ व परिसरात सक्रिय आहेत. त्यात अमेरिकेच्या ‘नासा’ने पाठविलेल्या पाच मोहिमांसह भारत, युरोपिय महासंघ, चीन व युएईच्या मोहिमांचा समावेश आहे.

leave a reply