सध्या आढळलेले ‘मंकीपॉक्स’चे रुग्ण हे हिमनगाचे टोक असू शकते

- ‘डब्ल्यूएचओ'चा इशारा

‘मंकीपॉक्स'चे रुग्णजीनिव्हा – सध्या जगभरात आढळणारे ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे रुग्ण हे हिमनगाचे टोक असू शकते. या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावू शकतो असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतरच योग्य ती दक्षता घेतली असती तर ही साथ पसरली नसती, असा शेरा ‘डब्ल्यूएचओ’ने मारल आहे. जगातील 20हून अधिक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग समोर आला असून जवळपास अडीचशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. युरोप, अमेरिका व लॅटिन अमेरिका या खंडांमध्ये या रोगाचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.

10 मे रोजी आफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात ब्रिटनमधील ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या रुग्णांची संख्या 106वर पोहोचली आहे. ब्रिटनपाठोपाठ युरोपातील इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. स्पेनमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा संसर्ग झालेल्यांची संख्या 90च्या वर गेली आहे.

‘मंकीपॉक्स'चे रुग्णयाव्यतिरिक्त युरोपमधील फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल, नेदरलॅण्डस्‌‍, बेल्जियम, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, आयर्लंड, स्वीडन, स्वित्झर्लंड, डेन्मार्क व फिनलंडमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चे रुग्ण आढळले आहेत. फक्त युरोप खंडातील ‘मंकीपॉक्स’च्या रुग्णांची संख्या 200वर पोहोचली आहे. युरोपबरोबरच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, युएई, मेक्सिको, अर्जेंटिना व बोलिव्हिया या देशांमध्येही ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा संसर्ग आढळला आहे. आफ्रिकेतील सुदानमध्येही रुग्ण सापडल्याचा संशय असला तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही.

‘मंकीपॉक्स'चे रुग्णअवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत जगातील 22 देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’ पसरल्याने आरोग्ययंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांनी सध्या आढळणारे रुग्ण हे केवळ हिमनगाचे टोक असू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. विषाणू आढळल्यानंतर नियमांचे पालन झाले असते, तर संसर्ग रोखण्यात यश मिळाले असते, असा दावाही ‘डब्ल्यूएचओ’कडून करण्यात आला आहे. त्याचवेळी ही साथ ‘कम्युनिटी स्प्रेड’च्या माध्यमातून वेगाने फैलावू शकते, याची जाणीव डब्ल्यूएचओने करून दिली आहे.

1970 साली आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास 10 आफ्रिकी देशांमध्ये ‘मंकीपॉक्स व्हायरस’च्या साथी येऊन गेल्या आहेत. 2003 साली अमेरिकेतही या विषाणूची साथ आली होती. मात्र युरोप खंडात यापूर्वी कधीही या विषाणूचा संसर्ग झाला नव्हता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता युरोपात वेगाने होणारा फैलाव आरोग्य यंत्रणांसमोरील चिंतेत भर टाकणारा ठरला आहे.

leave a reply