झिरो कोविड पॉलिसीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद

- आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्लेषकांचा दावा

झिरो कोविडबीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लादलेल्या झिरो कोविड पॉलिसीमुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्येच मतभेद निर्माण झाल्याचे समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि पंतप्रधान केकियांग यांच्या परस्परविरोधी भूमिका चीनच्या अर्थव्यवस्थेवर ताण टाकत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि विश्लेषकांनी चीनमधील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. या पॉलिसीमुळे चीनच्या जनतेमध्ये नाराजी आणि असंतोषाची भावना असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे शांघायपाठोपाठ राजधानी बीजिंगमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झिरो कोविड पॉलिसी लागू केली आहे. त्यामुळे निर्बंध लादलेल्या शहरे आणि काही भागांमध्ये कोरोना झालेल्यांना ‘मेटल बॉक्स’मध्ये राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. शांघायसारख्या औद्योगिक शहरांमध्ये झिरो कोविड पॉलिसीला कंटाळलेल्या नागरिकांनी आत्महत्या केल्याचे व्हिडिओ समोर आले होते. या धोरणाचा चीनच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला असून देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा जबर फटका बसण्याची शक्यता चीनच्या विश्लेषकांनी वर्तविली होती.

झिरो कोविडआता राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी लादलेल्या या धोरणाशी पंतप्रधान ली केकियांग सहमत नसल्याचे समोर येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देऊन पूर्वनिर्धारित विकासदर गाठण्यासाठी धोरणे राबवा, असे निर्देश पंतप्रधान केकियांग यांनी दिले आहेत. पण राष्ट्राध्यक्षांची झिरो कोविड पॉलिसी पंतप्रधान केकियांग यांच्या निर्देशांच्या आड येत असल्याची कबुली चीनचे वरिष्ठ अधिकारी व सरकारी कर्मचारी देत आहेत. ब्लूमबर्ग या अमेरिकन वृत्तसंस्थेने आठ चिनी अधिकारांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. यामुळे चीनच्या अधिकारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष आणि पंतपधान यापैकी कोणाच्या आदेशाचे पालन करावे, यावरून अधिकारी वर्गात गोंधळ उडाला आहे.

पंतप्रधान केकियांग देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी धोरणे आखत असले तरी त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोकडून समर्थन मिळत नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट पॉलिट ब्युरोच्या सात सदस्यांच्या समितीने अध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणा विरोधात बोलणारे किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याची बातमी चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याकडे अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने लक्ष वेधले आहे. केकियांग यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती, याकडे अमेरिकन वृत्तवाहिनी लक्ष वेधत आहे.

त्या वर्षाअखेरीस चीनच्या नेतृत्वाची विशेष परिषद पार पडणार आहे. त्याआधी कोविड प्रकरणी कोणतीही ढिलाई देणे कम्युनिस्ट पार्टीला मान्य नाही. त्यामुळे शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाशी मतभेद असले तरी कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या विरोधात जाणार नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या मुखापत्रातून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा उल्लेख कमी होऊन पंतप्रधान केकियांग यांचा उल्लेख वाढल्याचे दिसते आहे. पण केकियांग यांना जिनपिंग यांच्याविरोधात पूर्ण समर्थन मिळत असल्याचे दुसरे संकेत मिळालेले नाहीत, ही बाब देखील आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

आपल्या देशातील राजकीय मतभेद बंदिस्त चौकटीत आणि पोलादी व्यवस्थेत मिटविण्याची सवय चीनच्या कम्युनिष्ट पक्षाने लावून घेतली होती. मात्र आता चित्र बदलले असून चीनच्या पोलादी पडद्याआड असलेल्या बऱ्याच गोष्टी जगासमोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि पंतप्रधान केकियांग यांच्यातील मतभेदाच्या बातम्या ही बाब अधोरेखित करीत आहेत. पुढच्या काळात या राजकीय विसंवादाचा चीनच्या अंतर्गत राजकारणावर प्रभाव पडला, तर त्याचे फार मोठे पडसाद केवळ चीनच नाही, तर जगभरात उमटू शकतात.

leave a reply