अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा

नवी दिल्ली – अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

अफगाणिस्तानातील वाढता हिंसाचार, त्यामुळे शांतीप्रक्रियेला निर्माण झालेला धोका आणि कोरोनाव्हायरसचे संकट हे या चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. त्याचवेळी ही साथ रोखण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला केलेल्या सहाय्याबद्दल अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. तालिबानने अफगाणिस्तानातील आपले हल्ले तीव्र केले असून येत्या काही महिन्यात तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करेल, अशी चिंता काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभुमीवर सुरक्षा सल्लागार डोवल व अफगाणी परराष्ट्रमंत्र्यामधील ही चर्चा लक्षवेधी ठरते. अफगाणिस्तानसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत खल्मे झलिझदाद यांनी नुकतीच भारताच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा केली होती व या चर्चेतही अफगाणिस्तानचा मुद्दा अग्रस्थानी होता असे सांगितले जाते.

अफगाणिस्तानात तालिबानचे भीषण हल्ल्याचे सत्र सुरू झाले असून परिस्थिती अशीच कायम राहिली तर अफगाणिस्तानचे सध्याचे सरकार फार काळ सत्तेवर राहू शकणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जाते. त्यातच काही पाश्चिमात्य दैनिकांनी लवकरच तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करील, असे दावे केले आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या सरकारसह जगभरातील प्रमुख देशांच्या चिंतेत भर पडली आहे.

अफगाणिस्तानसारखा देश तालिबानच्या हाती पडणे भारताच्या सुरक्षेसाठी घातक बाब ठरू शकते. म्हणूनच भारताने तालिबानबरोबरील शांती करारावर अमेरिकेला सावधानतेचा इशारा दिला होता.

यापार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या सुरक्षा सल्लागाराशी केलेली चर्चा महत्वाची ठरते. अफगाणिस्तानात काही महिन्यांपूर्वी निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अब्दुला अब्दुला हे दोघेही विजयाचा दावा करीत आहे. तरी यामुळे अफगाणिस्तानात सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला असून या देशात सध्या काळजीवाहू सरकार कार्यरत असल्याचे दिसते. परराष्ट्रमंत्री अत्मार यांचा उल्लेखदेखील अफगाणिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्रमंत्री असाच केला जातो.

त्यामुळे तालिबानच्या संकटाबरोबरच अफगाणिस्तानला या राजकीय अनिश्चिततेचादेखील सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोनाव्हायरसच्या साथीची भयंकर समस्या देशाच्यासमोर ठाकली आहे . अशा परिस्थितीत भारत अफगाणिस्तानला स्थिर ठेवण्यासाठी फार मोठे सहाय्य करू शकतो. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबरील अफगाणी परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली चर्चा निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply