अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे चोवीस तासात अडीच हजारांहून अधिक बळी

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेसाठी युद्धापेक्षाही अधिक हानी करणारी ठरत असून गेल्या चोवीस तासात या साथीने अमेरिकेतील अडीच हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. तर ब्रिटनमधील या साथीच्या बळींची संख्या देखील भयावहरित्या वाढली असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली आहे. रशियातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेत २५०२ जण दगावले असून या साथीने अमेरिकेतील एकूण बळींची संख्या ६०,८५३ वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची संख्या १०,६७,३८२ वर गेली आहे. एका दिवसात अमेरिकेत कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. या साथीवर नियंत्रण मिळविणे अधिकाधिक अवघड बनत चालल्याचे स्पष्ट होत आहे. न्यूयॉर्क अमेरिकेतील कोरोनाचे प्रमुखकेंद्र ठरले असून न्यूयॉर्कमध्ये या साथीचे २० हजाराहून बळी गेले आहेत.

तर ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात या साथीचे ७६५ जण बळी गेले असून या देशातील एकूण बळींची संख्या २६ हजारांवर गेली आहे. ब्रिटनमधील या साथीच्या रुग्णांच्या संख्येत चोवीस तासात चार हजारांनी वाढ झाल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिली. ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेने देशातील कोरोना टेस्टिंगची संख्या वाढविली असून प्रति दिनी ब्रिटन एक लाख जणांची टेस्टिंग घेण्याच्या जवळ पोहोचला आहे.

ब्रिटनमधील डॉक्टर्सनी या साथीबाबत नवा इशारा दिला आहे. लहान मुलांमध्ये या साथीची अतिशय विचित्र लक्षणे दिसू लागली आहेत. या साथीने बाधित मुलांच्या त्वचेवर व्रण दिसू लागल्याचे ब्रिटीश डॉक्टरांचे म्हणणे आहे. या साथीबाबत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या जनतेला ऊद्देशून आवाहन केले. ब्रिटनवरील या साथीचे संकट टळलेले नाही. त्यामुळे ब्रिटनमधील लॉकडाउन मागे घेता येणार नसल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आतापर्यंत युरोपमध्ये कोरोनाव्हायरसने १,३३,७७२ जणांचा बळी घेतला असून इटलीत २७,६८२ तर स्पेनमध्ये २४,५४३, फ्रान्समध्ये २४,०८७, बेल्जियममध्ये ७,५९४ आणि जर्मनीत ६,५०४ जण दगावले आहेत. फ्रान्स आणि जर्मनीमधील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. तर लॅटीन अमेरिकेत या साथीने ८,१८९ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी ब्राझिलमध्ये ५,५४१, पेरूमध्ये ९४३, इक्वेडोरमध्ये ८८३ जणांचा बळी गेला आहे. ब्राझिल आणि इक्वेडोरमधील कोरोनाबाधितांची वाढती संख्या या देशातील आरोग्य यंत्रणेची कसोटी पाहणारी ठरत आहे.

leave a reply