जीनिव्हात अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा – सायबरहल्ले, अण्वस्त्र करार, राजनैतिक संबंध व मानवाधिकारांवर बोलणी झाल्याचा दावा

जीनिव्हा/वॉशिंग्टन/मॉस्को – युरोपच्या जीनिव्हा शहरात बुधवारी अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या चर्चेत प्रामुख्याने सायबरहल्ले, अण्वस्त्र करार, राजनैतिक संबंध व मानवाधिकारांच्या मुद्यांवर बोलणी झाल्याचे समोर आले आहे. बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन बोलणी रचनात्मक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, बायडेन रशियापुढे शरण गेले व रशियासाठी हा दिवस खूपच चांगला गेल्याची टीका केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर रशिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेत झालेले सायबरहल्ले, युक्रेन सीमेवरील लष्करी हालचाली, ऍलेक्सी नॅव्हॅल्नी व समर्थकांवर झालेली कारवाई, बेलारुस, आर्क्टिक व अंतराळातील स्पर्धा यासारख्या अनेक मुद्यांवर अमेरिका व रशियात सातत्याने खटके उडाले होते. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासंदर्भात बायडेन यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूतांनाही माघारी बोलावले होते. पुतिन यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, रशिया व अमेरिकेतील संबंध सध्या रसातळाला पोहोचले असल्याचे वक्तव्यही केले होते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान होणार्‍या भेटीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले होते. जीनिव्हा शहरात बायडेन व पुतिन यांच्या भेटीत जवळपास तीन तास विविध मुद्यांवर बोलणी झाली. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव उपस्थित होते. भेटीच्या सुरुवातीला पुतिन यांचे अंगरक्षक व अमेरिकी पत्रकारांदरम्यान झटापट झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

बायडेन व पुतिन यांनी बैठकीनंतर झालेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये चर्चेसंदर्भात माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी राजदूतांची पुन्हा नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्याचवेळी अण्वस्त्रांसंदर्भातील करारावर चर्चा करण्याचीही तयारी दर्शविली आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या मुद्यावर सकारात्मक पावले उचलण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, सायबरहल्ले व नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियाला इशारा दिल्याची माहिती दिली. रशियाने अमेरिकेच्या १६ संवेदनशील क्षेत्रांमध्ये सायबरहल्ल्याचा प्रयत्न केल्यास त्याल कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, या शब्दात बजावल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. त्याचवेळी नॅव्हॅल्नी यांचा तुरुंगात मृत्यू झाला तर रशियन राजवटीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिल्याचेही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. युक्रेनबाबत अमेरिकेची भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट संकेतही बायडेन यांनी दिले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मानवाधिकारांच्या मुद्यावर अमेरिकेला प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला. यात त्यांनी अमेरिकेत ‘कॅपिटल हिल’वर झालेला हिंसाचार व निदर्शकांना झालेली अटक तसेच ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या आंदोलनाचा उल्लेख केला. बायडेन यांची भेट व विश्‍वासार्हता याबद्दल पुतिन यांनी काढलेले उद्गार लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. ‘आयुष्यात आनंद राहिलेला नाही, क्षितिजावर फक्त आनंदाचे मृगजळ दिसत आहे. त्यावरच समाधान माना’, असे सूचक वक्तव्य पुतिन यांनी केले आहे. पुतिन यांचे हे वक्तव्य रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे शब्द आहेत.

दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन-पुतिन भेटीवरून बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पुतिन यांच्यासमोर शरणागती पत्करली व अमेरिकेच्या हाती काहीही लागलेले नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी रशियासाठी भेटीचा दिवस खूपच चांगला गेल्याच टोलाही त्यांनी लगावला आहे. अमेरिकेतील प्रमुख माध्यमांनीही पुतिन यांनी, त्यांना हवे ते मिळविण्यात यश मिळविल्याचे दावे केले आहेत.

leave a reply