चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत जागतिक वर्तुळात चर्चा

- ६०० हून अधिक दिवस परदेश दौरा नाही

बीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत जागतिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या ६०० हून अधिक दिवसांमध्ये जिनपिंग यांनी एकही परदेश दौरा केलेला नाही. ‘जी२०’ गटातील कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख सलग इतका दीर्घकाळ देशात राहिलेला नाही. गेल्या काही दिवसात पार पडलेल्या ‘ब्रिक्स’ तसेच ‘एससीओ’च्या बैठकीला जिनपिंग व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत जागतिक वर्तुळात चर्चा - ६०० हून अधिक दिवस परदेश दौरा नाहीआंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी शेवटचा परदेश दौरा म्यानमारचा केला होता. हा दौरा जानेवारी २०२० मध्ये पार पडला होता. त्यानंतर तिबेटला दिलेली भेट वगळता जिनपिंग राजधानी बीजिंगच्या बाहेर फारसे गेले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. अमेरिकेतील ‘युएस टुडे’ने दिलेल्या वृत्तात जिनपिंग परदेशी नेत्यांची भेट घेण्याचे टाळत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात चीनमध्ये आलेल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या दौर्‍यामध्ये जिनपिंग यांच्या भेटीचा कार्यक्रम टाळण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. बहुतांश परदेशी नेत्यांना राजधानी बीजिंगबाहेर उतरविण्यात आले आहे. या नेत्यांना जिनपिंग यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट देण्यात आल्याचे समोर येत आहे. आरोग्यासंदर्भातील समस्या असल्यानेच जिनपिंग परदेशी नेत्यांची भेट टाळत असावेत, असे म्हंटले जात आहे.

२०१९ साली युरोप दौर्‍यात घडलेल्या घटनांकडेही माध्यमांनी लक्ष वेधले आहे. या दौर्‍यात मानवंदना घेताना चिनी राष्ट्राध्यक्षांची पावले अडखळली होती. तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर चर्चेला बसताना त्यांना खुर्चीच्या दोन्ही हातांचा आधार घ्यावा लागला होता. त्यावेळीही त्यांच्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र चीनच्या राजवटीने त्या फेटाळल्या होत्या. गेल्या वर्षी शेन्झेनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात जिनपिंग नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा आले होते. तसेच ते सातत्याने खोकत, पाणी पिऊन हळु आवाजात बोलत होते.

ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, गेली एक वर्ष व आठ महिने कोणत्याही देशाला भेट न देता चीनमध्येच राहणार्‍या जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. जिनपिंग यांच्या बाहेर न पडण्यामागे इतर काही कारणेही असू शकतात, असा दावा काही माध्यमे करीत आहेत. त्यात कोरोनाच्या साथीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली चीनची बदनामी व जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीविरोधात कम्युनिस्ट पक्षात होणारे संभाव्य बंड यांचा समावेश आहे. गेल्या दोन तीन वर्षात चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधातील नाराजी अधिक उघडपणे व्यक्त होत आहे, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

leave a reply