राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणाविरोधात चीनमध्ये नाराजीचे सूर

बीजिंग – ‘चीनने आतापर्यंत अनेक देशांना आर्थिक सहाय्य पुरविले आणि इतर मदतही केली. पण चीनला जेव्हा खरी गरज होती, तेव्हा यापैकी एकही देश चीनच्या बाजूने उभा राहिला नाही. सध्याचे परराष्ट्र धोरण चीनसाठी लाभदायी ठरलेले दिसत नाही’, अशी नाराजी चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’चे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल दाई शी यांनी व्यक्त केली. तसेच नेमक्या शब्दात जनरल दाई यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या परराष्ट्र धोरणाला यश मिळाले नसल्याची बाब अधोरेखित केली आहे. चीनमध्ये अशारितीने सर्वाधिकार हाती असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांचे अपयश जाहीररित्या मांडण्याची परंपरा नाही. म्हणूनच जनरल दाई यांनी व्यक्त केलेली ही नाराजी लक्षवेधी ठरते.

Jinpingचीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आणि पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याविरोधात असलेली नाराजी हळुहळू समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जनरल दाई शी यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या परराष्ट्र धोरणावर परखड मते मांडली होती. ‘गेली कित्येक वर्षे चीन आणि अमेरिकेमध्ये चांगले व्यापारी संबंध होते. पण अमेरिकेने चीनवर ठपका ठेवून व्यापारयुद्ध पुकारले व या चीनविरोधी युद्धात अमेरिकेत एकजूट आहे. पण चीननेही आपण कागदी वाघ नसून वेळ पडल्यास नरडीचा घोट घेणारे खरेखुरे वाघ आहोत, याची जाणीव ठेवायला हवी’, असे परखड मत दाई यांनी मांडले आहे.

याद्वारे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे अमेरिकाविरोधातील धोरण कागदी वाघासारखे असल्याची अप्रत्यक्ष टीका जनरल दाई यांनी मोठ्या चलाखीने केल्याचे दिसते. त्याचवेळी चीनविरोधी आघाडीत अमेरिकेत एकजूट असल्याचे सांगून चीनमध्ये अशा एकजुटीचा अभाव आहे का, अशी शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न जनरल दाई यांनी केल्याचे यामुळे समोर येत आहे. जपानचे इंग्रजी भाषेतील जर्नल ’निक्के एशियन रिव्ह्यू’ने जनरल दाई यांची ही मते प्रसिद्ध केली आहेत.

जनरल दाई यांच्याप्रमाणे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीतूनही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणांविरोधात सूर उमटू लागले आहेत. काही आठवड्यांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीतील वरिष्ठ नेते ’रेन झिकियांग’ यांनी देखील कोरोनाव्हायरसप्रकरणी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. जिनपिंग यांचे कोरोनाबाबतचे धोरण चुकल्याचा ठपका झिकियांग यांनी ठेवला होता. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करुन झिकियांग यांना कम्युनिस्ट पार्टीतून बेदखल करण्यात आले. पण जिनपिंग यांच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन एकटा पडत चालल्याची जाणीव कम्युनिस्ट पार्टीला झाल्याचा दावा काही माध्यमे करीत आहेत. म्हणूनच जिनपिंग यांच्या जागी उपपंतप्रधान ’हू चुनहूआ’ यांच्या नियुक्तीबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Jinping-Chinaदरम्यान, आत्तापर्यंत आपल्या सर्वच राजकीय प्रतिस्पर्धांवर मात करुन त्यांचा काटा काढण्यात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना कमालीचे यश मिळाले होते. माओ यांच्यानंतर कम्युनिस्ट चीनची सारी सत्ता एकहाती ठेवणारे राष्ट्राध्यक्ष, अशी जिनपिंग यांची ओळख बनली आहे. पण आता कोरोनाव्हायरसचा उद्रेक आणि अमेरिकेबरोबरचा व्यापारयुद्ध तसेच जगातील सर्वच प्रमुख देशांचा विरोध याचा परीणाम चीनच्या अंतर्गत राजकारणावर होऊ लागला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग असुरक्षित बनले असून त्यांच्या निरंकुश सत्तेला धक्के बसू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिशितीत जनरल दाई यांनी आपल्या लेखात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका, चीनमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींचे संकेत सार्‍या जगाला देत आहे.

leave a reply