‘कोव्हॅक्सिन’च्या वितरणालाही सुरुवात

नवी दिल्ली – सिरमच्या ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ हैदराबादमधील भारत बायोटेकच्या प्लांटमधून ‘कोव्हॅक्सिन’च्या वितरणाला सुरुवात झाली आहे. देशाभरात दिल्लीसह ११ शहरांमध्ये कन्साईन्मेंट पाठविण्यात आले. सरकारने सध्या ‘कोव्हॅक्सिन’च्या ५५ लाख डोससाठी भारत बायोटेकबरोबर करार केला आहे.

देशात कोरोनाचे लसीकरण सुरू होण्यास केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबविली जात आहे. यामुळे सार्‍या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व अग्रभागी राहून कोरोना लढ्यात सहकार्य करणार्‍या इतरांना लस देण्यात येत आहे. यासाठी ओळख पटवून नोंदणी करण्याचे काम गेल्या महिन्यातच पूर्ण करण्यात आले होते.

३ जानेवारीला द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) एकूण दोन लसींना मंजुरी दिली होती. यामध्ये ‘कोविशिल्ड’ ही लस ब्रिटीश कंपनी ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ यांनी मिळून विकसित केली आहे. या लसीसे उत्पादन हे भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात येत आहे. तर दुसरी लस ‘भारत बायोटेक’ व ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’ने (आयसीएमआर) विकसित केली असून संपूर्णत: स्वदेशी लस आहे.

‘कोविशिल्ड’च्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली होती. तर ‘कोव्हॅक्सिन’चे वितरण मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुरुवात झाली. भारत बायोटेकच्या हैदराबाद येथील प्रकल्पातून ११ शहरांसाठी कन्साईन्मेंट रवाना करण्यात आली. दिल्ली, गुवाहाटी, आंध्र प्रदेशच्या गनावरम, पटना, कुरुक्षेत्र, बंगळुरू, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांमध्ये ही कन्साईन्मेंट पाठविण्यात आली. एकूण किती डोस रावाना करण्यात आले, याबाबत मात्र माहिती कंपनीने दिलेली नाही.

सरकारने सिरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या १ कोटी १० लाख लसींसाठी करार केला आहे, तर ‘कोव्हॅक्सिन’साठी भारत बायोटेकबरोबर ५५ लाख लसींसाठी करार झाला आहे. सिरम ‘कोविशिल्ड’ ही लस २०० रुपये प्रती डोस प्रमाणे सरकारला देत आहे. तर भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’ लस २९५ रुपये प्रतिडोस याप्रमाणे सरकारला देत आहे. मात्र सरकारने ऑर्डर केलेल्या ५५ लाख ‘कोव्हॅक्सिन’ लसींपैकी १६.५ लाख लस भारत बायोटेककडून सरकारला मोफत दिल्या जात आहेत.

leave a reply