सिरियात नव्याने आयएसविरोधी संघर्ष भडकण्याची शक्यता

दमास्कस – ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियन लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात किमान २० जवानांचा बळी गेला. या व्यतिरिक्त ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियन जवानांचे अपहरण केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने सिरियामध्ये आपल्या सैन्याची अतिरिक्त कुमक रवाना केल्याचा दावा सिरियन मुखपत्राने केला आहे. तर रशियन विनाशिका देखील सिरियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे सिरियातील ‘आयएस’विरोधी संघर्ष नव्याने भडकण्याची शक्यता बळावली आहे.

सिरियाच्या पूर्वेकडील इराक सीमेजवळील ‘देर अल-झोर’ तसेच ईशान्य सीमेजवळील भागात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी येथील युफ्रेटस नदीच्या क्षेत्रात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियन जवानांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात २० जवान मारले गेले. गेल्या वीस दिवसात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी ‘देर अल-झोर’ भागात सिरियन जवानांवर चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो.

दोन आठवड्यांपूर्वी लष्कराच्या बसमधून आपल्या घरासाठी निघालेल्या सिरियन जवानांवर ‘आयएस’ने बॉम्ब हल्ला चढविला होता. या हल्ल्यात ३९ जवानांचा बळी गेला होता. यानंतर गेल्या आठवड्यात रशियाने ‘आयएस’च्या ठिकाणांवर १७० हवाई हल्ले चढविल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटनेने केला होता. त्यावर पलटवार करण्यासाठी ‘आयएस’ने पुन्हा एकदा याच भागात सिरियन जवानांना लक्ष्य केले.

‘देर अल-झोर’ व्यतिरिक्त सिरियाच्या हमा आणि राक्का भागातही ‘आयएस’च्या कारवाया सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सिरियाच्या उत्तरेकडील राक्का भागात ‘आयएस’ने नागरी भागात दोन हल्ले चढविले असून यात नागरिकांचा बळी गेल्याची चिंता व्यक्त केली जाते. पण याचे तपशील उघड होऊ शकलेले नाहीत.

‘आयएस’प्रमाणे ‘जबात अल-नुस्र’ या अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनेने देखील चोवीस तासात २१ ठिकाणी हल्ले चढविल्याचा दावा सिरियात तैनात असलेल्या रशियन लष्कराने केला. इदलिब, अलेप्पो आणि लताकिया या तीन प्रांतात अल-नुस्रने संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियन लष्कर करीत आहे.

गेल्या आठवड्यातच अलेप्पो प्रांतात इंधनाची तस्करी करणार्‍या तुर्की संलग्न दहशतवाद्यांवर रशियाने ड्रोन हल्ले चढविले होते. या हल्ल्यात इंधनाचे टँकर्स उद्ध्वस्त झाले होते. गेल्या काही आठवड्यांपासून सिरियातील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनू लागली आहे. रशियाने लष्कराची चिलखती वाहने, रणगाड्यांचा समावेश असलेली विनाशिका सिरियाच्या तारतूस बंदरासाठी रवाना केली आहे. त्याचबरोबर सिरियाच्या पूर्वेकडील कामिश्‍ली महामार्गावर रशियाने आपले लष्कर तैनात केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

तर अमेरिकेने देखील सिरियातील आपली तैनाती वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचा दावा सिरियातील अस्साद राजवटीशी संलग्न असलेली वृत्तसंस्था करीत आहे. अमेरिकेची ३० लष्करी वाहने इराकमार्गे सिरियाच्या देर अल-झोर भागात दाखल झाली आहेत. यामध्ये तोफा, रणगाडे यांचा समावेश असून अमेरिकी हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षेत लष्करी वाहनांचा हा ताफा देर अल-झोरमधील अमेरिकेच्या लष्करी तळाच्या दिशेने रवाना झाल्याचे सदर वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

त्यामुळे सिरियातील ‘आयएस’ आणि अल कायदा संलग्न जुबात अल-नुस्र’ या दहशतवादी संघटनांच्या कारवायांविरोधात अमेरिका व रशियानेही बाह्या सरसारवल्याचे दिसत आहे.

leave a reply