डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘डब्ल्यूएचओ’ च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला अभिमान असून सर्व देशवासीयांसाठी गौरवाची बाब असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले. चीनवरील आरोपानंतर ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या स्वतंत्र चौकशीला मान्यता दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन ‘डब्ल्यूएचओ’ च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.

डॉ. हर्ष वर्धन यांनी जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांच्या कडून पदभार स्वीकारला. ‘डब्ल्यूएचओ’ ने कार्यकारी मंडळाच्या १४७ व्या सत्राचे व्हर्चुअल आयोजन केले होते. यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी पदभार स्वीकारला. हर्षवर्धन यांनी जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहीली. ”आरोग्य सेवा बळकट करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे काय परिणाम होतात याची जाणीव या साथीच्या रोगामुळे झाली. जागतिक संकटाच्या अशा काळात योग्य व्यवस्थापन व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे”, असे यावेळी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले.

दरम्यान यावेळी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची व देशातील परिस्थीची माहिती हर्ष वर्धन यांनी दिली. भारतातील मृत्यूदर केवळ ३ टक्के आहे. १३५ करोड लोकसंख्या असलेल्या देशात रुग्णांची संख्या केवळ १ लाख असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील रुग्णांचा बरा होण्याचा दर ४० टक्क्यांपेक्षा अधिक असून दुप्पट होण्याचा दर हा १३ दिवसांचा असल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.

”समूळ उच्चाटन शक्य असलेल्या रोगांमुळे जे मृत्यू होतात, त्यांना आळा घालण्यासाठी आक्रमक मार्ग शोधणे गरजेचे आहे. औषधे आणि लसींची जागतिक कमतरता बघता त्यात सुधारणांची आवश्यकता असून नवीन मार्ग तयार करणे गरजेचे आहे. सदस्य देश आणि इतर भागधारकांनी सातत्याने यादिशेने काम केल्यास सुधारणांना बळकटी मिळेल”, असा विश्वास डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला.

leave a reply