122 एमएम कॅलिबर आणि पिनाका रॉकेटच्या प्रगत आवृत्तीच्या चाचण्या

चांदीपूर – कोरोनाच्या दुसरी लाट सुरू झाल्यावर डीआरडीओकडून थांबविण्यात आलेल्या शस्त्रांच्या चाचण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. गुरुवारी सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र निर्भयची चाचणी डीआरडीओने घेतली होती. यानंतर 122 एमएम कॅलिबर रॉकेटच्या आणि पिनाका रॉकेटच्या अद्ययावत आवृत्तीच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या (एमबीआरएल) सहाय्याने घेण्यात आलेल्या या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. अद्ययावत पिनाकाच्या एकूण 25 चाचण्या दोन दिवसात घेण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. 122 एमएम कॅलिबर व पिनाका रॉकेटच्या प्रगत आवृतीच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संशोधकांची प्रशंसा केली आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडिशाच्या चांदीपूर येथील तळावरून या चाचण्या घेतल्या आहेत. पिनाका रॉकेटच्या चाचण्या या गुरुवारी 24 जून आणि शुक्रवारी 25 जून असे सलग दोन दिवस घेण्यात आल्या. पिनाका रॉकेटची मार्क-1 आवृत्ती गेल्या 21 वर्षांपासून भारतीय लष्करात दाखल आहे. कारगिल युद्धातही देशी बनावटीची ही रॉकेट अत्यंत उपयोगी ठरली होती. मात्र आता त्याची मारक क्षमता वाढविण्यात येत आहे. 75 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे पिनाकाची मार्क-2 आवृत्ती सध्या विकसित करण्यात येत आहे. तर पिनाका मार्क-1 च्या मारक क्षमतेत आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात घेण्यात आलेल्या चाचण्या या मार्क-1 आवृत्तीच्या होत्या. मात्र या रॉकेटची मारक क्षमता आता 40 किलोमीटरवरून 45 किलोमीटर इतकी झाली आहे.

पिनाका रॉकेट चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी व जूनमध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर एलएसीवर मोठ्या प्रमाणावर ही रॉकेट तैनात करण्यात आली. तसेच या रॉकेटची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पिनाका रॉकेट लॉन्चरसच्या सहा रेजिमेंटच्या उत्पादनासाठी तीन कंपन्यांबरोबर करार करण्यात आले होते. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभमीवर हे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे वाढीव मारक क्षमता असलेल्या पिनाकाच्या रॉकेटच्या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात.

त्याचवेळी शुक्रवारी 122 एमएम कॅलिबर रॉकेटच्याही अद्ययावत आवृत्तीच्या चाचण्या घेण्यात आल्या. भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेल्या या रॉकेटची मारक क्षमता 40 किलोमीटरपर्यंत आहे. या चाचणीदरम्यान मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने एकूण चार रॉकेट डागण्यात आली आणि त्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला. टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिमच्या सहाय्याने या चाचण्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. ज्या उद्देशाने या चाचण्या घेण्यात आल्या त्या परिणामवर या चाचण्या यशस्वी ठरल्याचे संरक्षणमंत्रालयाने म्हटले आहे.

122 एमएम कॅलिबर रॉकेट सिस्टिम डीआरडीओच्या पुण्यातील आर्मामेेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरीने (एचईएमआरएल) संयुक्तरित्या विकसित केली आहे. सध्या लष्कराच्या ताफ्यात असलेल्या 122 एमएम गॅ्रड रॉकेट्सची जागा येत्या काळात ही प्रगत 122 एमएम कॅलिबर रॉकेट्स घेतील. त्यामुळे 122 एमएम कॅलिबर रॉकेटच्या चाचण्यांना मिळालेले यश महत्त्वाचे ठरते.

leave a reply