‘एनसीबी’कडून डार्कनेटच्या माध्यमातून चालणारे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

नवी दिल्ली – नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) डार्कनेट आणि ऑनलाईन फार्मसीद्वारे चालणारे अमली पदार्थांचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट नष्ट केले आहे. हे रॅकेट भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पसरलेले होते. त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फिलिफाईन्स या देशातही या रॅकेटकडून अमली पदार्थांची तस्करी केली जात होती. तसेच यासाठी बिटकॉईनचा वापर होत होता. एनसीबीने टाकलेल्या छाप्यांमध्ये 22 लाख सायकोट्रोपिक गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आठ जणांना अटक झाली आहे.

अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनाच्या दिवशीच एनसीबीने नशेबाजीसाठी सायकोट्रोपिक गोळ्यांचा व्यापार करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा?भांडाफोड केला. या अमली पदार्थांच्या व्यापारासाठी डार्कनेटचा वापर करण्यात येत होता. यासाठी 9 वेबसाईट तयार करण्यात आल्या होत्या आणि या वेबसाईटची नोंदणी भारताबाहेरील आली होती. भारताबाहेरील आयपी अ‍ॅड्रेसचा वापर करून भारतात आपल्या या अमली पदार्थांच्या व्यापाराला लपविण्याचे काम ही टोळीने केली होती, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी एनसीबीला एक खात्रिशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीनच्या पथकाने छापा टाकून सायकोट्रोपिक गोळ्यांचा काही साठा जप्त केला होता. याची चौकशी करताना सायकोट्रोपिक गोळ्यांचा नशेसाठी व्यापार करणार्‍या काही आरोपींची माहिती समोर आली होती. हे आरोपी बनावट नावाने आपली ओळख लपवून वावरत असल्याचे तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आग्रा येथून एकाला ताब्यात घेण्यात आले.

या आरोपीकडून त्याला सायकोट्रोपिक गोळ्या पुरविणार्‍या एका एक. ए. गोयल नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. गोयललाही आग्र्यातून अटक करण्यात आली, त्याच्या कसून चौकशीनंतर त्याने हरिद्वार येथील एका औषध कंपनीचे नाव घेतले. ही औषध कंपनी अधिकृत परवान्यानुसार सायकोट्रोपिक गोळ्यांचे उत्पादन घेत असली, तरी यातील काही साठा ही कंपनी तस्करांना पुरवत होती. यानंतर या कंपनीवर छापा टाकून 22 लाख सायकोट्रोपिक गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. गेल्या वर्षांत नशेसाठी सायकोट्रोपिक गोळ्यांचा वापर वाढला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता असून पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे तंत्रज्ञान हातळण्यात माहिर असल्याची माहितीही एनसीबीकडून देण्यात आली.

दरम्यान, शनिवारी पंजाबच्या अमृसरमध्ये पोलिसांनी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने यावर्षांत आतापर्यंत पकडण्यात आलेले सुमारे 1300 कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट केले. अमली पदार्थ आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त ही कारवाई करण्यात आली. तसेच एनसीबीकडून जाहीर एका आकडेवारीनुसार देशात गेल्या काही वर्षात अमली पदार्थांची तस्करी कित्येक पटीत वाढली आहे.

leave a reply