तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचे उत्पादन व तस्करी वाढेल

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

अंमली पदार्थांचे उत्पादनकाबुल – ‘तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून दहशतवादी आणि गुन्हेगार संघटना अस्थैर्याचा फायदा घेऊन अफगाणिस्तानात तळ ठोकू लागल्या आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील अवैध अंमली पदार्थांचे उत्पादन आणि त्याच्या शेजारी देशांममधील तस्करीचा ओघ वाढण्याची शक्यता बळावली आहे’, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला. तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अफगाणिस्तानातील अंमली पदार्थविरोधी कारवाया देखील बंद झाल्याचे माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेल्यापासून या देशातील अंमली पदार्थांच्या उत्पादनाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अंमली पदार्थांच्या जगभरातील तस्करीवर नजर ठेवणार्‍या ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम-युएनओडीसी’ या संघटनेची गेल्या आठवड्यात तातडीची बैठक पार पडली. व्हिएन्ना येथे झालेल्या या बैठकीतही युएनओडीसीच्या अध्यक्षा ‘घाडा वली’ यांनी अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवरुन नवा इशारा दिला. अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचे उत्पादन आणि तस्करी रोखण्यावर वली यांनी भर दिला.

‘जगातील अंमली पदार्थांच्या एकूण उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन एकट्या अफगाणिस्तानातून केले जाते. अफगाणिस्तानातील बदलेल्या परिस्थितीमुळे दहशतवादी आणि गुन्हेगारी संघटना येथील अस्थैर्याचा फायदा घेऊन अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीत वाढ करण्याची संधी साधत आहेत. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनण्यापासून रोखायचे असेल तर अंमली पदार्थांची अवैध तस्करी आणि संबंधित गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न तीव्र करावे लागतील’, असा इशारा युएनओडीसीच्या अध्यक्षा वली यांनी दिला.

तर अफगाणिस्तानविषयाचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक मोहम्मद खान अंदार यांनी याहून गंभीर इशारा दिला. ‘अंमली पदार्थांचे उत्पादन आणि तस्करी याच्याविरोधात वेळीच केली नाही तर अफगाणिस्तानातील गरीबी, दुर्दशा वाढेल. यामुळे अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांचे उत्पादन व तस्करी अनेकपटींनी वाढेल’, असे अंदार यांनी बजावले. काही दिवसांपूर्वी पॅरिसस्थित ‘फायनॅन्शियल ऍक्शन टास्क फोर्स-एफएटीएफ’ने देखील अफगाणिस्तानातील दहशतवाद व त्यासंबंधीत आर्थिक गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली होती.

अंमली पदार्थांचे उत्पादनआंतरराष्ट्रीय संघटना, विश्‍लेषक अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांचा सुळसूळाट व अंमली पदार्थांच्या तस्करीवर इशारे देत असताना, तालिबानने मात्र सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. आपली राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांची तस्करी थांबल्याचा दावा तालिबानने केला आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना ताब्यात घेतल्याचेही तालिबाननचे म्हणणे आहे.

मात्र, १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून येथील युएनओडीसीच्या सर्व कारवाया बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे प्रांत तालिबानच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे तालिबान करीत असलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहणे कुणालाही शक्य नाही. तालिबानचे अर्थकारण अमली पदार्थांच्या व्यापारावरच अवलंबून होते, हे याआधी उघड झालेले आहे.

अशा परिस्थितीत तलिबान आपल्या देशातील नशेचा हा व्यापार बंद करण्याऐवजी त्याला अधिकाधिक उत्तेजन दिल्यावाचून राहणार नाही, अशी चिंता जगभरातील जबाबदार विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. त्यावेळी अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणार्‍या पैशांवर दहशतवादी संघटना फोफावत असल्याने, अफगाणिस्तानातील अमली पदार्थांच्या व्यापारातील वाढ हे सार्‍या जगासाठी दुहेरी संकट ठरणार आहे.

leave a reply