पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा भारताला नवा प्रस्ताव

रियाध – ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये केवळ काश्मीर ही एकच समस्या आहे. ही समस्या चर्चेद्वारे सुटली तर दोन्ही देशांना सहकार्याचे अफाट लाभ मिळतील. भारताला मध्य आशियाई देशांसाठी व्यापाराचा मार्ग खुला होईल. पण पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पराभूत केल्यानंतर, दोन्ही देशांमधील चर्चेसाठी ही चांगली वेळ ठरणार नाही’, असा टोला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लगावला. पाकिस्तानच्या संघाने मिळविलेला विजय पंतप्रधान इम्रान खान यांना पचवता आलेला नाही, हेच त्यांच्या उद्गारातून स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भारताबरोबरील चर्चेसाठी कलम ३७० मागे घेण्याची अट इम्रान खान यांनी मागे टाकल्याचे संकेत त्यांच्या विधानांमधून मिळत आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा भारताला नवा प्रस्तावकाही दिवसांपूर्वी अमेरिकन वृत्तवाहिनीने अमेरिका व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चर्चेची बातमी दिली होती. अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी आपली हद्द अमेरिकेला वापरू देण्याची तयारी पाकिस्तानने दाखविली आहे. पण याच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या सरकारने भारताबरोबरील आपले संबंध ‘मॅनेज’ करून देण्याची गळ अमेरिकेला घातली होती. यामध्ये काश्मीर प्रश्‍नाचा स्वतंत्र उल्लेख नव्हता, ही लक्षवेधी बाब ठरते. काही केल्या भारत कश्मीर प्रश्‍नावर तडजोड करणार नाही आणि या संदर्भात अमेरिकेचे दडपणही मान्य करणार नाही, याची खात्रीच पाकिस्तानच्या सरकारला पटलेली असावी. तसे संकेत अमेरिक वृत्तवाहिनीच्या या बातमीतून मिळाले होते. पाकिस्तानच्या सरकारने ही बातमी फेटाळली असली, तरी भारताबरोबर चर्चा करण्यासाठ इम्रान खान यांचे सरकार खूपच उत्सुकता दाखवित आहे, असे दावे पाकिस्तानच्याच काही पत्रकारांनी केले आहेत.

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट स्थितीत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला अधिक कर्ज देण्याचे नाकारले. करवसुलीत प्रचंड वाढ व अनुदान देण्याचे बंद करून महसूल वाढविल्याखेरीज पाकिस्तानला यापुढे कर्ज मिळणार नाही, असे नाणेनिधीने बजावले होते. त्यातच एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. याचे भयंकर परिणाम पाकिस्तानात दिसू लागले असून पाकिस्तानचा रुपया डॉलरमागे १७४ रुपयांपर्यंत घसरला. याने महागाई भडकली असून रोजगारनिर्मिती थांडावलेली आहे. चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या अंतर्गत पाकिस्तानात करीत असलेली गुंतवणूक रोखून धरली आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानातील दासू वीज प्रकल्पावर काम करीत असलेल्या आपल्या इंजिनिअर्सच्या हत्येसाठी पाकिस्तानने ३८ दशलक्ष डॉलर्स मोजावे, अशी मागणी चीनने केली आहे.

याबरोबरच चीन पाकिस्तानला दिलेल्या कर्जासाठी तगादा लावत आहे. यामुळे पाकिस्तानने पुन्हा एका अमेरिकेकडे याचना सुरू केल्याचे दिसते. याबरोबरच सौदी अरेबिया या आपल्या मित्रदेशाकडे पाकिस्तानने पुन्हा एकदा हात पसरले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यासाठी सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेल्याचे सांगितले जाते. या दौर्‍यावरच त्यांनी भारताबरोबरील संबंधांवर शेरेबाजी केली. त्याचवेळी भारताला मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापारी मार्ग खुला करून देण्याचे गाजरही दाखविले. हे सारे चीन व अमेरिका यांच्या अविश्‍वास आणि नाराजीचे परिणाम असल्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानला सहाय्य करून पाकिस्तानने अमेरिकेचा विश्‍वासघात केला व म्हणूनच या देशाला अद्दल घडविणे भाग आहे, असे अमेरिकेचे नेते बोलत आहेत. अशा काळात चीननेही पाकिस्तानकडे पाठ फिरविण्याची तयारी केली असून आता भारताच्या सहाय्याखेरीज पाकिस्तान वाचणार नाही, असे दावे पाकिस्तानी माध्यमातीलच काहीजण करीत आहेत.

याचे परिणाम दिसू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी भारताला दिलेला मध्य आशियाई देशांबरोबर व्यापारासाठी मार्ग खुला करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. तोच प्रस्ताव इम्रान खान नव्याने देत आहेत. पण भारताने पाकिस्तानला बाजूला सारून मध्य आशियाई देशांबरोबर वेगळ्या मार्गाने व्यापारी वाहतुकीची तयारी केली आहे. हे दिसू लागल्यानंतर पाकिस्तान या सहकार्याचे प्रस्ताव देऊ लागला आहे. त्यामुळे भारत सध्या तरी याकडे फार गंभीरपणे पाहण्याची शक्यता नाही.

leave a reply