मणिपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ ५०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली/इंफाळ – मणिपूरमध्ये भारत-म्यानमार सीमेला लागून असलेल्या भागात अमली पदार्थांचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला. राज्याच्या इतिहासातच प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ एकाच ठिकाणाहून पकडण्यात आले आहेत, असे मणिपूर पोलिसांनी म्हटले आहे.

मणिपूरच्या तेनूगोपाल जिल्ह्यात म्यानमारमधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून थोड्या अंतरावर असलेल्या मोरेहमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीची खात्रिशीर माहिती पोलिसांना लागली होती. मोरेहमध्ये असलेल्या एका गोदामात तस्करी करून आणलेले अमली पदार्थ लपविले जात असल्याचे तपासात लक्षात आले होते. त्यानंतर या गोदामावर पोलीस गेल्या काही दिवसांपासून बारकाईने लक्ष ठेवून होते.

मणिपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ ५०० कोटींचे अमली पदार्थ जप्तसोमवारी दुपारी मणिपूर पोलीस आणि लष्कराच्या आसाम रायफल्सच्या जवानांनी संयुक्त करवाई हाती घेत, या गोदामावर छापा टाकला. या छाप्यात ५४ किलो ब्राउन शूगर, १५४ किलो क्रिस्टल मेथामफेटामिन सापडले. या अमली पदार्थांची आंंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५०० कोटी रुपये आहे. या छाप्यात एका म्यानमारी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी मणिपूर सरकारने अमली पदार्थांविरोधात युद्धाची घोषणा केली होती. याद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याबरोबर राज्यात छुप्या पद्धतीने केल्या जाणार्‍या अफूच्या शेतीवरही कारवाई केली होती. या अमली पदार्थविरोधी युद्धादरम्यान मणिपूरमध्ये आतापर्यंत जप्त करण्यात आलेला सर्वात मोठा साठा असल्याचे मणिपूर सरकारने अधोरेखित केले आहे. अमली पदार्थविरोधात मणिपूर सरकारने हाती घेतलेल्या कारवाईमुळे ही तस्करी मोठ्या प्रमाणावर घटली असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

म्यानमार, लाओस आणि थायलंड हा अमली पदार्थांच्या व्यापाराचा गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम, नागालॅण्डला लागून १६०० किलोमीटरची म्यानमार सीमा असून येथून भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. अमली दहशतवादाचे भारताच्या सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे. अमली पदार्थाच्या व्यापारातून मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणावर दहशतवादी संघटनांना पुरविला जातो. तसेच ईशान्य भारतात म्यानामारमधून होणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीमुळे येथील तरुण या पदार्थांच्या व्यसनाच्या जाळ्यात अडकतात, असे आसाम रायफल्सने म्हटले आहे.

leave a reply