गुजरातमध्ये समुद्रात 200 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गांधीनगर – गुजरातच्या जखाऊ बंदराजवळ पाकिस्तानातून तस्करी करण्यात आलेला अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या अमली पदार्थांची किंमत 200 कोटी रुपयाहून अधिक असून सात तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला जखाऊ किनारपट्टीवर अमली पदार्थांचा मोठा साठा उतरणार असल्याची खात्रिशीर माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर तटरक्षकदलाला याची तातडीने याबाबत कळविण्यात आले. यानंतर तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने संयुक्त मोहीम हाती घेतली.

जखाऊनजीक एक संशयित बोटीची ओळख पटविण्यात आली. ही पाकिस्तानी मच्छिमार बोट असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय किनारपट्टीच्या दिशेने येणाऱ्या या मच्छिमार बोटीच्या संशयित हालचाली हेरल्यानंतर तटरक्षकदलाच्या अरिजय जहाज त्या दिशेने पाठविण्यात आले. मात्र भारतीय तटरक्षकदलाचे जहाज आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येतात आपण ड्रग्जसह पकडले जाऊ नये म्हणून बोटीवरील तस्करांनी बोटीवरील अमली पदार्थांच्या गोणी समुद्रात फेकण्यास सुरुवात केली.

तटरक्षकदल आणि एटीएसने बोटीवरील सात जणांना अटक केली, तसेच ही पाकिस्तानी बोटही ताब्यात घेतली. 31 मे रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. या बोटीतून या पाकिस्तानी तस्करांनी समुद्रात फेकलेला अमली पदार्थांचा साठा सापडला आहे. जखाऊ येथे तैनात सीमा सुरक्षादल (बीएसएफ) आणि मरीन पोलिसांनी रविवारी हा साठा समुद्रातून जप्त केला.

सुमारे 50 किलो इतके हेरॉईन यामध्ये असून याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 200 कोटीहून अधिक आहे. याबाबत पकडण्यात आलेल्या तस्करांची कसून चौकशी सुरू आहे. पाकिस्तानने भारतात सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढविली आहे. याआधी गुजरात किनारपट्टीनजीक अमली पदार्थांच्या तस्करीचे असे अनेक प्रयत्न उधळण्यात आले आहेत.

leave a reply