परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर झेक प्रजासत्ताकमध्ये दाखल

झेकप्राग – स्लोव्हाकियाच्या दौऱ्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर झेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागमध्ये दाखलझाले. पुढच्या महिन्यापासून युरोपिय महासंघाचे अध्यक्षपद झेक प्रजासत्ताककडे येणार आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो. याची सुरूवात परराष्ट्रमंत्र्यांनी झेक प्रजासत्ताकाच्या युरोपिय संसदेतील सदस्यांच्या भेटीने केली. त्यांच्याशी इंडो-पॅसिफिक, अन्न व इंधनसुरक्षा आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्यावर आपली चर्चा पार पडली, अशी माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली आहे.

स्लोव्हाकिया व त्यानंतर झेक प्रजासत्ताक या देशांचा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा दौरा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. युक्रेनसंदर्भात भारताने स्वीकारलेल्या भूमिकेवर टीका करणाऱ्या युरोपियन देशांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी एका परिसंवादात सणसणीत चपराक लगावली होती. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर रशियाच्या विरोधात भारताने भूमिका स्वीकारली नाही व सहकार्य कायम ठेवले, यासाठी अमेरिका व युरोपिय देश सातत्याने भारताला लक्ष्य करीत आहेत. तसेच भारताच्या रशियाबरोबरील इंधनव्यवहारावरही अमेरिका व युरोपिय देशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. पण हे धोरण आत्मकेंद्री ठरते, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपिय देशांना आरसा दाखविला होता.

युक्रेन प्रकरणी भारतावर दोषारोप करणारे युरोपिय देश आशिया खंडातील समस्येवर कित्येकवेळा स्वस्थ बसून राहिले होते, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली. त्यांच्या भाषणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’च्या संपादकीय लेखात जयशंकर यांचे उद्गार म्हणजे युरोपच्या आत्मकेेंद्री धोरणांवर भारताकडून आलेली प्रतिक्रिया असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच युरोपिय देशांना युक्रेनच्या युद्धानंतर भारतावर टाकलेल्या दबावामुळेच भारत आता युरोपिय देशांना सडेतोड प्रत्युत्तर देत असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनबाबतही कठोर धोरण स्वीकारले हेोते. भारताच्या चीनबरोबरील सीमावादात जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांचे चीनविरोधात सहाय्य मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण आता पाश्चिमात्य देश कुठलीही भू-राजकीय समस्या धडपणे हाताळू शकत नाहीत, त्यांच्यामुळे युद्ध पेट घेते हे युक्रेनच्या समस्येमुळे जगासमोर आले आहे. यामुळे भारतही सावध झाला असून भारत व चीन आपल्यासमोरील समस्या हाताळू शकतात, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर युरोपिय देशांना सांगत आहेत. याचे कारण भारताला चीनशी युद्ध नको आहे, असा निष्कर्ष ग्लोबल टाईम्सने नोंदविला आहे.

प्रत्यक्षात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनबरोबरील समस्या हाताळण्याची धमक भारताकडे आहे, असे युरोपिय देशांना सुनावले होते. युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाच्या विरोधात जाऊन भारताने युक्रेनची बाजू घेतली नाही, तर उद्या चीनने भारताला लष्करी आव्हान दिल्यास भारताच्या बाजूने पाश्चिमात्य देश उभे राहणार नाहीत, अशी धमकी स्लोव्हाकियामधील परिसंवादात देण्यात आली होती. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताकडे चीनला टक्कर देण्याची धमक आहे, ही बाब राजनैतिक भाषेत मांडली होती. त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सकडून केला जात आहे.

leave a reply