बाल्कन क्षेत्रातील सर्बिया-कोसोवो तणाव दूर करण्यासाठी स्वतंत्र दूत पाठविल्याचा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन/बेलग्रेड/प्रिस्तिना – युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील सर्बिया व कोसोवोमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण दूत पाठविल्याचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. यावेळी माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कारकिर्दीत सर्बिया व कोसोवोमध्ये झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी बायडेन प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली. ट्रम्प यांच्याकडून दूत पाठविण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नसून अमेरिकेचे प्रतिनिधित्त्व करणारे कोणतेही दूत पाठविण्यात आलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसने बजावले.

गेल्या काही महिन्यात, बाल्कन क्षेत्रातील सर्बिया व कोसोवोमधील तणाव अधिकच चिघळत असल्याचे समोर येत आहे. कोसोवो सरकारच्या नव्या नियमांविरोधात सर्बवंशिय नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर सर्बियाने आक्रमक भूमिका घेत कोसोवोच्या सीमेनजिक अतिरिक्त लष्करी तैनाती केली असून रणगाडेही रवाना केल्याचे समोर आले आहे. कोसोवोच्या राष्ट्राध्यक्षांनी यामागे रशिया व सर्बियाचा कट असल्याचा आरोप केला होता.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करीत खळबळ उडविली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी सर्बिया व कोसोवोला नुकत्याच भेट दिलेल्या रिचर्ड ग्रेनेल या माजी अधिकार्‍यांचा उल्लेख, माझे दूत असा केला. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी अशा रितीने दुसर्‍या देशात दूत पाठविण्याचा दावा करण्याची ही पहिलीच घटना आहे. माजी राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांना असे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे व्हाईट हाऊससह अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

व्हाईट हाऊसने, माजी राष्ट्राध्यक्ष असणार्‍या ट्रम्प यांना दुसर्‍या देशात अशा रितीने दूत पाठविण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांनी ट्रम्प हे ‘शॅडो डिप्लोमसी’ करीत असल्याचा ठपका ठेवला आहे. ट्रम्प यांनी दावा केलेले रिचर्ड ग्रेनेल यांनी ट्रम्प यांच्या कारकिर्दीत बाल्कन क्षेत्रासाठी विशेष दूत म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली सर्बिया व कोसोवोमध्ये घडविण्यात आलेल्या करारांमध्ये ग्रेनेल यांची महत्त्वाची भूमिका होती. या अनुषंगानेच त्यांनी पुम्हा एकदा सर्बिया व कोसोवोला भेट दिल्याचे सांगण्यात येते. मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांमुळे त्यांची ही भेट वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply