गडचिरोलीत चकमकीत २६ माओवादी ठार

गडचिरोली – गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील कोटगुलच्या जंगलात बारा तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या चकमकीत सी-६० कमांडोंज्नी २६ माओवाद्यांना ठार केले. गेल्या तीन वर्षातील गडचिरोलीच्या जंगलात झालेले हे सर्वात मोठे ऑपरेशन ठरतेे. या चकमकीमध्ये माओवाद्यांचा वरीष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडेही ठार झाल्याचे वृत्त आहे. तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४० माओवाद्यांना ठार करण्यात आले होते.

माओवादी कोटगुलच्या जंगलात एकत्र येणार असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या माओवाद्यांविरोधातील मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या सी-६० कमांडोंनी या जंगलात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी जंगलातील दूर्गम भागात माओवादी व जवानांची चकमक उडाली. बारा तासाहून अधिक काळ ही चकमक सुरू होती. शनिवारी दुपारपर्यंत सहा माओवादी यात ठार झाल्याचे स्पष्ट होते. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षादलांच्या हाती लागले. मात्र सायंकाळपर्यंत आणखी २६ माओवाद्यांचे मृतदेह जंगलात सापडले आहे. तसेच अद्याप शोध मोहिम सुरू असून चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या वाढू शकते.

हे माओवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत होते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यांना कोटगुलच्या जंगलात विशेष प्रशिक्षण दिले जात होते, असे वृत्त आहे. गडचिरोलीत गेल्या काही महिन्यात माओवाद्यांच्या मोठ्या प्रमाणावर हालचाली दिसून आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षादलांनी गडचिरोलीतील मोहीम तीव्र केली आहे. २०१९ साली १ मे रोजी माओवाद्यांनी गडचिरोलीत सी-६० जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर सातत्याने माओवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे.

शनिवारी ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये मिलिंद तेलतुंबडे या माओवादी नेत्याचाही समावेश असल्याच्या बातम्या येत आहेत. मिलिंद तेलतुंबडेचा तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या दंगली घडविण्यातही हात होता. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच राष्ट्रीय तपास संस्थेकडूनही (एनआयए) मिलिंद तेलतुंबडेचा शोध सुरू होता.

leave a reply