राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या धोरणांमुळे तुर्कीवरील आर्थिक संकट अधिकच बळावले

तुर्कीवरील आर्थिक संकटइस्तंबूल – राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांचे आर्थिक धोरण आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरवरील कारवाई यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील लिराची घसरण झाली. सोमवारी तुर्कीचे चलन असलेल्या लिराच्या मूल्यात एक टक्का इतकी घसरणीची नोंद झाली असून या देशातील महागाई देखील शिगेला पोहोचली आहे. यामुळे तुर्कीवरील आर्थिक संकट अधिकच बळावल्याचा इशारा स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय संघटना देत आहेत.

ग्राहक किंमत निर्देशांकात वाढ होत असतानाही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी व्याजदरात कपात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. उच्च व्याजदरांमुळे महागाईत वाढ होते, असे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून तुर्कीच्या सेंट्रल बँकेने व्याजदरात चार टक्क्यांची कपात केली व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण याने तुर्कीवरचे आर्थिक संकट टळलेले नाही. उलट अशा चुकीच्या आर्थिक धोरण व निर्णयाचा परिणाम लिरावर होत असल्याची टीका आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकन डॉलर आणि युरोच्या तुलनेत लिराच्या मूल्यात सलग घसरणीची नोंद झाली. या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत लिराच्या मूल्यात ४० टक्क्यांची घसरण झाल्याचा दावा केला जातो.

तुर्कीवरील आर्थिक संकटनोव्हेंबर महिन्यातील चलनफुगवटा २१.३१ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात याचे प्रमाण १९.८९ टक्के इतके होते. तुर्कीच्या घाऊक बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भडकल्या असून तुर्कीच्या जनतेतील असंतोष वाढत आहे. नैसर्गिक इंधनवायूच्या दरात १०२ टक्क्यांची वाढ झाली. राजधानी अंकारा, इस्तंबूलमधील अंडी, मांस, ब्रेडच्या किंमतीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. तुर्की सध्या भीषण महागाईचा सामना करीत आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपल्या चुकीच्या धोरणांपासून फारकत घेतली नाही तर तुर्कीच्या जनतेला ‘हायपरइन्फेलशन’ला अर्थात भयंकर दरवाढीला सामोरे जावे लागेल, असा इशारा ‘फायनॅन्शियल टाईम्स’ने दिला होता. अशा परिस्थितीत तुर्कीतील जनतेला एका वेळेचे पोटभर अन्न देखील मिळणार नाही, अशी चिंता आंतरराष्ट्रीय संघटना व्यक्त करीत आहेत.

तुर्कीवरील आर्थिक संकटया महागाईवर मात करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या जनतेला मांसाहार कमी करण्याची सूचना केली होती. मांसाहारापेक्षा नागरिकांनी शाकाहाराचे प्रमाण वाढवावे, आपल्या आहाराच्या सवयी बदलाव्या, असे एर्दोगन यांनी सुचविले होते. ‘राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना फार उशीरा शहाणपण सुचले असून आम्ही फार आधीच आमच्या गरजा कमी केल्या आहेत. तरी देखील महागाई आम्हाला पोळून काढत आहे’, अशी जळजळीत टीका तुर्कीची जनता करीत आहे.

आर्थिक आघाडीवर दाखविलेल्या अशा बेजबाबदारपणामुळे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटल्याचे काही सर्वेक्षणातून उघड झाले होते. दरम्यान, तुर्कीला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आता इतर देशांचे सहाय्य घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच ते सध्या कतारच्या दौर्‍यावर गेल्याचे बोलले जाते. कतारने आपल्याला आर्थिक सहाय्य करावे व या संकटातून वाचवावे, अशी मागणी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply