जम्मू व काश्मीरमध्ये तिन्ही संरक्षणदलांचा संयुक्त युद्धसराव

संरक्षणदलांचाश्रीनगर – जम्मू व काश्मीरमध्ये तिन्ही संरक्षणदलांचा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने आयोजित केलेल्या या युद्धसरावात वायूसेना व नौदलही सहभागी झाले. तिन्ही संरक्षणदलांमधील संपर्क व समन्वय वाढविण्यासाठी हा युद्धसराव महत्त्वाचा ठरेल. दहशतवादी हल्ला झाल्यास, भारत पाकिस्तानमध्ये घुसून लष्करी कारवाई करील, असा इशारा देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी दिला आहे. भारताचा हा इशारा पोकळ नाही, हे या संयुक्त युद्धसरावाद्वारे पाकिस्तानला दाखवून दिले जात आहे.

तिन्ही संरक्षणदलांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सद्वारे शत्रूच्या हद्दीत घुसून मोहीम फत्ते करण्याचा सराव यावेळी करण्यात आला. यानुसार सुमारे नऊ हजार फूट उंचीवरून भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारे या ‘टास्क फोर्स’मधील जवानांना बर्फाच्छादित प्रदेशात ड्रॉप करण्यात आले. या जवानांमध्ये भारतीय लष्कराच्या ‘इंफन्ट्री, स्पेशल फोर्सेस’ आणि नौदलाच्या ‘मार्कोस’ फोर्सेसचा समावेश होता. यासाठी अमेरिकेकडून खरेदी करण्यात आलेल्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. तसेच इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राचीही चाचपणी यावेळी करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.

संरक्षणदलांचासमुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या दुर्गम भागातही मोहीम फत्ते करण्याची भारतीय लष्कराची क्षमता यावेळी प्रदर्शित झाली, असे लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. जम्मू व काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडून भारताला हादरा देण्याचा प्रयत्न पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआय करीत आहे. मात्र देशात दहशतवादी हल्ला झाला, तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, याची जाणीव भारताचे राजकीय व लष्करी नेतृत्व करून देत आहे.

दहशतवादी हल्ला झाल्यास, पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाई करताना भारत कचरणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच बजावले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पाकिस्तानला अशाच शब्दात इशारा दिला होता. हे इशारे पोकळ नसून भारताकडे तसे करण्याची क्षमता आहे, याची जाणीव तिन्ही संरक्षणदलांच्या या युद्धसरावाद्वारे पाकिस्तानला करून दिली जात आहे.

leave a reply