इराणचा अणुकरार अंतिम टप्प्यात असताना, इजिप्तमध्ये अरब देशांची विशेष बैठक सुरू

अरब देशांचीकैरो – इराणचा अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचल्याच्या बातम्या येत असताना, इजिप्तच्या अल-अलामिन शहरात अरब देशांची तातडीची बैठक सुरू झाली आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी ही बैठक आयोजित केली. अरब देशांच्या या बैठकीत सौदी अरेबियाचा समावेश नाही, ही बाब लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या 16 महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अणुकरारावरील वाटाघाटींना यश मिळू लागल्याचे दावे केले जातात. अमेरिका व युरोपिय देशांमधील चर्चेनंतर या अणुकराराची घोषणा होऊ शकते. अशा परिस्थितीत, इजिप्तने अरब देशांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्याबरोबर युएईचे राजे मोहम्मद बिन झाएद अल नह्यान, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, बाहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा आणि इराकचे हंगामी पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांचा या बैठकीत समावेश आहे. युक्रेनच्या संघर्षामुळे निर्माण झालेले ऊर्जा व अन्नधान्याचे संकट या मुद्यांवर अरब देशांच्या या बैठकीत चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जाते. या बैठकीत उपस्थित असलेला इराक वगळता इतर चारही देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. उघडपणे मान्य केले नसले तरी इजिप्तमधील या अरब देशांच्या या चर्चेत इराणच्या अणुकराराचा मुद्दा ऐरणीवर असेल, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

अरब देशांचीअमेरिका व युरोपिय देश इराणबरोबर नव्याने अणुकरार करून युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधनाची समस्या सोडविण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी युरोपिय देशांनी इराणला निर्णायक इशारा दिला होता. त्यानंतर इराणच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत होते. अपेक्षेनुसार इराणने नव्याने अणुकरार संपन्न होईल, असे जाहीर केले होते. मात्र सदर अणुकराराचा मार्ग इतका सोपा नाही. इस्रायल, सौदी व इतर आखाती देशांकडून त्यावर जहाल प्रतिक्र्रिया उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

इजिप्तमध्ये सुरू असलेली अरब देशांची चर्चा त्याचेच संकेत देणारी बाब ठरते. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणशी अणुकरार केलाच, तर या देशाच्या अण्वस्त्रसज्जतेचा मार्ग मोकळा होईल, असा इशारा इस्रायल सातत्याने देत आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वाने तर इराणला हा अधिकार मिळाल्यास, आपला देश देखील मागे राहणार नाही, अशी धमकीच दिली होती. सौदीच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या इतर अरब देशांनीही इराणच्या या अणुकराराबाबत अशाच स्वरुपाच्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या.

राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर, अमेरिका पुन्हा एकदा इराणबरोबर अणुकरारासाठी पुढाकार घेईल, हे उघड झाले होते. त्यानंतर इस्रायलने अरब-आखाती देशांबरोबरील आपले सहकार्य अधिकच दृढ करण्यासाठी वेगाने पावले उचलली होती. याचे परिणाम दिसू लागले असून आखातात इराणच्या विरोधातील अरब देशांची भक्कम आघाडी उभी राहत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात इस्रायलच्या नेगेव्ह येथे झालेली अरब-आखाती देशांची बैठक त्याचा दाखला देणारी होती. इजिप्तमध्ये सुरू असलेली ही बैठक हा या इराणविरोधी आघाडीचा पुढचा भाग आहे का, ते लवकरच स्पष्ट होईल.

leave a reply