सायप्रस इस्रायलकडून आयर्न डोम खरेदी करणार

आयर्न डोमअथेन्स – शेकडो रॉकेट्सच्या वर्षावाविरोधात यशस्वी ठरलेली इस्रायलची आयर्न डोम ही हवाई सुरक्षा यंत्रणा सायप्रस खरेदी करणार आहे. सायप्रसच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत इस्रायलशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीकडून असलेल्या धोक्याविरोधात सायप्रस आयर्न डोमची तैनाती करू शकतो, असे एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.

भूमध्य समुद्रातील सायप्रस आणि तुर्की यांच्यात गेली कित्येक दशके वाद सुरू आहे. सायप्रसच्या उत्तरेकडील भूभागावर तुर्कीने ताबा घेतला असून तुर्र्की उर्वरित सायप्रसवर देखील हल्ल्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त केली जाते. तुर्कीच्या लढाऊ विमानांनी आणि गस्तीनौकांनी सायप्रसच्या हद्दीजवळून प्रवास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सायप्रस आपली संरक्षण सज्जता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून सायप्रसने इस्रायलकडून ‘आयर्न डोम’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्यासाठी हालचाली वाढविल्याचा दावा ग्रीक वर्तमानपत्राने केला.

आयर्न डोमइस्रायल आणि सायप्रसमध्ये आयर्न डोमच्या कराराबाबत चर्चा पूर्ण झाली असून लवकरच याची घोषणा अपेक्षित असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात सायप्रसच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलचा दौरा करून संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेट घेतली होती. तर गेल्या वर्षभरापासून इस्रायलने सायप्रस, ग्रीस या भूमध्य सागराशी जोडलेल्या देशांबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यावर भर दिला होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच इस्रायल आणि तुर्कीमध्ये राजकीय सहकार्य नव्याने प्रस्थापित झाले होते. आधीच्या काळात निर्माण झालेले तीव्र मतभेद मागे टाकून तुर्की व इस्रायल नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याची घोषणा दोन्ही देशांच्या नेत्यांनी केली होती. मात्र हे सहकार्य प्रस्थापित झाले तरी तुर्कीच्या महत्त्वाकांक्षेपासून धोका असलेल्या देशांबरोबरील सहकार्यातून आपण माघार घेणार नसल्याचा संदेश इस्रायल देत आहे. सायप्रसला आयर्न डोम पुरविण्याचा इस्रायलचा हा निर्णय त्याचेच संकेत देत आहे.

आयर्न डोमइस्रायलचा हा निर्णय तुर्कीच्या चिंतेत भर घालणारा ठरेल. मात्र सध्या तरी याचा इस्रायल व तुर्कीच्या सहकार्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण सध्याच्या काळात इस्रायलबरोबरील सहकार्य ही अडचणीत सापडलेल्या तुर्कीच्या नेतृत्त्वाची फार मोठी गरज बनली आहे. सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांकडून इस्लामधर्मिय देशांचे नेतृत्त्व खेचून आपल्याकडे घेण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे एकेकाळी पाश्चिमात्यांशी उत्तम संबंध असलेला सुधारणावादी देश ही तुर्कीची प्रतिमा मागे पडून या देशाचा प्रवास कट्टरवादाच्या दिशेने सुरू झाल्याचे आरोप करण्यात येत होते. पण गेल्या काही वर्षात झालेल्या घडामोडींमुळे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या धोरणात बदल करावेच लागले.

तुर्कीची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी एर्दोगन यांनी पाश्चिमात्य देशांशी जुळवून घेण्याबरोबरच सौदी अरेबिया व युएईशी पुन्हा सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला होता. इस्रायलशी पुन्हा एकदा राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्णय हा याच बदललेल्या धोरणांचा भाग ठरतो. याला प्रतिसाद दिला तरी इस्रायल सायप्रस व ग्र्रीस सारख्या तुर्कीच्या धोरणांपासून धोका संभवणाऱ्या देशांशी सहकार्य मागे घेणार नाही. याची जाणीव इस्रायलने तुर्कीला करून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply