देशात कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’चे आठ रुग्ण आढळले

‘स्ट्रेन’

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेले आठ रुग्ण भारतात आढळले आहेत. हे सर्वजण ब्रिटनमधून परतले होते. यातील तीन जण बंगळुरूमधील असून दोन जण हैदरबादमधील आहेत, तसेच एक जण पुण्यात आढळला आहे. तमिळनाडूतही दोन जण नव्या प्रकाराच्या कोरोना व्हायरसने ग्रस्त आढळले आहेत. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र अतिशय वेगाने संक्रमण पसरवू शकणार्‍या ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाचा बदललेल्या विषाणूचा फैलाव देशात होऊ नये यासाठी सावधानतेचा इशारा, तज्ज्ञांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमध्ये म्यूटेशन अर्थात बदल झाल्याचे समोर आले होते. हा बदलेला कोरोना विषाणू ७० टक्के अधिक वेगाने ही साथ पसरवित असल्याचे संशोधनात समोर आल्यावर खळबळ माजली होती. ब्रिटनमध्ये यामुळे गेल्या तीन आठवड्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच ब्रिटनमधून युरोपातील विविध देशांबरोबर आफ्रिकेतही हा विषाणू पोहोचला आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारताने २३ डिसेंबरपासून ब्रिटनमधून येणार्‍या सर्व विमानसेवा रद्द केल्या होत्या. तसेच याआधी उड्डान केलेल्या विमानातून भारतात पोहोचलेल्या शेकडो प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्यात आली आणि त्यांना कॉरंटाईन केले गेले. तसेच २५ नोव्हेंबरनंतर २० डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांनाही ट्रॅक केले जात आहे.

ब्रिटनमधून परतलेल्या प्रवाशांपैकी ११४ प्रवासी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. देशातील विविध भागात हे प्रवासी आढळून आले. यातील आठ प्रवासी आता कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचा संशय असलेल्या या रुग्णांचे नमूने ‘इंडियन सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कन्सोर्टियम लॅब’मध्ये (इनसाकॉग) पाठविण्यात आले होते. देशात अशा दहा लॅब सरकारने उभारल्या आहेत. ज्यामध्ये विषाणूच्या जिनोम सिक्वेन्सची तपासणी केली जाते. कोरोना विषाणूची नवी स्ट्रेनची लागण झाली आहे कींवा नाही याचा निष्कर्ष जिनोम सिक्वेन्सच्या तपासणीतूनच काढला जाऊ शकतो. त्यामुळे ब्रिटनमधून परतलेल्या आणि कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेल्या ११४ जणांचे नमुने इनसाकॉग प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

भारतात गेल्या तीन दिवसांपासून देशात कोरोनाच्या साथीचे २० हजारहून पेक्षा रुग्ण दरदिवशी आढळून येत आहेत. मात्र आता कोरोनाच्या नवी स्ट्रेन देशात दाखल झाल्यामुळे चिंता वाढल्या आहेत. सरकारने यामुळे घाबरून जाऊ नका, तर सतर्क रहा असे आवाहन केले आहे. कोरोनावर बनलेल्या लसी कोरोनाच्या म्यूटेशन झालेल्या विषाणूवरही प्रभावी ठरू शकतात, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, नागरी उड्डयन मंत्रालयाने ब्रिटनमधून येणारी विमान सेवा ३१ डिसेंबरनंतरही स्थगितच राहील अशी घोषणा केली आहे.

leave a reply