श्रीनगरमधील ‘दहशतवाद्यांचा’ अंत

श्रीनगर – शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधून ‘लश्कर-ए-तोयबा’चा कमांडर ठार झाल्यानंतर, श्रीनगरमध्ये एकही स्थानिक दहशतवादी सक्रीय नाही. येथील ‘दहशतवाद्यांचा’ अंत झाल्याची जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार घटल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले.

Shrinagar-Terroristsशनिवारी श्रीनगरमध्ये सुरक्षादलाच्या चकमकीत लश्करचे दोन दहशतवादी ठार झाले. यात एक लश्करचा कमांडर होता. ‘इशफाक रशिद खान’ असे या ठार झालेल्या दहशतवाद्यांचे नाव आहे. तो श्रीनगरचा स्थानिक असून २०१८ सालापासून तो लश्करमध्ये सक्रीय होता. शनिवारी सुरक्षा दलाने त्याला ठार केल्यानंतर श्रीनगरमध्ये एकही स्थानिक दहशतवादी नेता शिल्लक राहिलेला नसल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. श्रीनगर दहशतवादमुक्त झाला, हे इतक्यात सांगता येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

गेल्या काही आठवड्यांपासून सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. यावर्षी आतापर्यंत सुरक्षा दलाने १४० दहशतवाद्यांना ठार केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचारात घट झाल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था देखील सुधारत असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरील गोळीबारात वाढ झाल्याचे सिंग यांनी सांगितले.

leave a reply