महिन्याअखेरीस हिंदी महासागरात ‘ब्रह्मोस’च्या चाचण्या होणार

नवी दिल्ली – चीनबरोबरील तणाव वाढलेला असताना या महिन्याच्या अखेरीस हिंदी महासागरात ‘ब्रह्मोस ‘या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तिन्ही संरक्षणदलांच्या ‘ब्रह्मोस’ आवृत्तींच्या चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्राने दिली आहे. गेल्या महिन्याभरात तीन वेळा ‘ब्रह्मोस’च्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

'ब्रह्मोस'च्या चाचण्या

‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र असून हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. ‘ब्रह्मोस’ हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘संरक्षण संशोधन विकास संस्थे’ने (डीआरडीओ) ‘ब्रह्मोस’ची मारक क्षमता २९० किलोमीटर्सवरुन ४०० किलोमीटर्सपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या अखेरीस ‘ब्रह्मोस’च्या घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान , ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘सुखोई -३० एमकेआय’ या लढाऊ विमानावरुन ‘ब्रह्मोस’ या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील सुमारे ४०० किलोमीटर दूरवरील लक्ष्य भेदण्यात आले होते. तर त्याआधी स्वदेशी बनावटीची स्टेल्थ विनाशिका ‘आयएनएस चेन्नई’ मधून ‘ब्रह्मोस’ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नौदल आवृत्तीची चाचणी घेण्यात आली होती. यावेळी ‘ब्रह्मोस’ने अरबी समुद्रातील आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा साधला होता. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या विस्तारीत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती.

leave a reply