भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या प्रयत्‍नात

-पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानातील १८ राजकीय पक्षांनी पुकारलेला लाँग मार्च व त्याला मिळणार्‍या भरघोस प्रतिसादामुळे भांबावून गेलेल्या पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सरकारने भारताविरोधात बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या प्रयत्‍नात असल्याचा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. तर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असलेला ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्प बंद पाडण्यासाठी भारताचे प्रयत्‍न सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी केला. तर इम्रान सरकार व लष्कर पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण करून आपल्याविरोधातील जनक्षोभ शमविण्याचा प्रयत्‍न करीत असल्याचा ठपका पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी ठेवला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशातील अस्थैर्यासाठी भारत जबाबदार असल्याचे खापर फोडले होते. पाकिस्तानातील विरोधी पक्षांचा वापर करुन पंजाब, सिंध आणि बलोचिस्तान असे पाकिस्तानचे तीन तुकडे पाडण्याच्या तयारीत भारत आहे, असा दावा इम्रान यांनी केला होता. भारताला अमेरिका आणि इस्रायलची साथ असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताच्या पंतप्रधानांची गोपनीय भेट घेतल्याचे तारे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तोडले होते. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या आरोपांना परराष्ट्रमंत्री कुरेशी तसेच पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल बाबर इफ्तिखार यांनीही साथ दिली.

भारतीय गुप्तचर यंत्रणने सीपीईसी ठप्प पाडण्यासाठी, तब्बल ८० अब्ज डॉलर्स गुंतवल्याचा तसेच ७०० दहशतवादी तयार केल्याचा हास्यास्पद आरोप कुरेशी यांनी केला. भारतीय गुप्तचर यंत्रणांविरोधातील सर्व पुरावे आपल्याकडे असून लवकरच ते संयुक्त राष्ट्रसंघासमोर सादर करणार असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भारत अफगाणिस्तानचा वापर करुन पाकिस्तानात हल्ले चढवित असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात भारत लाहोर, कराची आणि इस्लामाबाद या तीन प्रमुख शहरांमध्ये घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचेही कुरेशी म्हणाले. यासाठी भारत पाकिस्तानातील सरकार व लष्करविरोधी दहशतवादी गटांचे सहाय्य घेणार असल्याचा दावा कुरेशी यांनी केला.

पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्रमंत्री कुरेशी आणि पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या या आरोपांच्या पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी चिंधड्या उडविल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ तसेच पाकिस्तानातील इतर विरोधी पक्षांनी इम्रान सरकारच्या विरोधात पाकिस्तान पंजाब, सिंध, बलोचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधून काढलेल्या निषेध मोर्चाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर पंतप्रधान इम्रान चक्रावून गेले आहेत. त्यामुळे आपल्याविरोधातील जनतेचा आक्रोश दाबण्यासाठी इम्रान सरकार पाकिस्तानात भीतीचे वातावरण तयार करीत असल्याचा पलटवार पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते करीत आहेत.

इम्रान खान व त्यांचे समर्थक विरोधी पक्ष नेत्यांवर देशद्रोहाचे आरोप करुन आपल्यावरील राजकीय संकटाचे निवारण करू पाहत आहेत. गगनाला भिडलेली महागाई, वाढती बेरोजगारी आणि फसलेले परराष्ट्र धोरण या सार्‍या अपयशाकडून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी इम्रान खान अतिशय घातक खेळी करीत असल्याचे जबाबदार पत्रकारांचेही म्हणणे आहे. याचे परिणाम पुढच्या काळात पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशारा हे पत्रकार देत आहेत.

leave a reply