अमेरिकेच्या शत्रूंकडे सायबर हल्ल्यांद्वारे पॉवर ग्रीड बंद पाडण्याची क्षमता

- अमेरिकेच्या ऊर्जामंत्री जेनिफर ग्रॅनहोल्म

वॉशिंग्टन – ‘देशातील भल्या मोठ्या पॉवर ग्रीड्स अर्थात वीज सयंत्र सायबर हल्ल्यांनी ठप्प करण्याची क्षमता अमेरिकेच्या शत्रूंकडे आहे. असे हल्ले नेहमीच होत असतात. अगदी मी हे बोलत असतानाही असे सायबर हल्ले होत असतील’, अशी माहिती अमेरिकेच्या ऊर्जामंत्री जेनिफर ग्रॅनहोल्म यांनी दिली. त्याचबरोबर सायबर किंवा रॅन्समवेअर हल्लेखोरांच्या धमक्यांना बळी पडून खाजगी कंपन्यांनी खंडणी देऊ नये, असे आवाहन ग्रॅनहोल्म यांनी केले. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वात मोठ्या इंधनवाहिनी कंपनीवर सायबर हल्ला चढविणार्‍या हल्लेखोर गटाने 50 लाख डॉलर्सची खंडणी उकळली होती. त्याचा संदर्भ देऊन ग्रॅनहोल्म यांनी हे आवाहन केले.

Advertisement

अमेरिकेच्या शत्रूंकडे सायबर हल्ल्यांद्वारे पॉवर ग्रीड बंद पाडण्याची क्षमता - अमेरिकेच्या ऊर्जामंत्री जेनिफर ग्रॅनहोल्मगेल्या महिन्याभरात अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी कंपनी ‘कोलोनिअल पाईपलाईन’, ‘मीट प्रॉडक्शन’ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणार्‍या ‘जेबीएस’ तसेच ‘फेरी सर्व्हिस’ व दोन ‘टीव्ही न्यूज स्टेशन्स’वर मोठे सायबर हल्ले झाले आहेत. हे सारे हल्ले रॅन्समवेअर प्रकारातील असल्याचा दावा केला जातो. तर त्याआधी सायबर हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्ट, सोलरविंड्स, फायरआयसारख्या आघाडीच्या कंपन्यांपासून महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांनाही लक्ष्य केले होते.

अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन-एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी, सरकार आणि खाजगी कंपन्यांवर होणार्‍या या सायबर व रॅन्समवेअर हल्ल्यांची तुलना 9/11च्या दहशतवादी हल्ल्याशी केली होती. कारण 9/11 आणि या रॅन्समवेअर हल्ल्यांमुळे निर्माण झालेली आव्हाने एकसारखी आहेत व अमेरिकी जनतेवर मोठ्या उलथापालथींना सामोरे जाण्याची वेळ ओढावल्याचा इशारा एफबीआयच्या प्रमुखांनी दिला होता.

अमेरिकेच्या शत्रूंकडे सायबर हल्ल्यांद्वारे पॉवर ग्रीड बंद पाडण्याची क्षमता - अमेरिकेच्या ऊर्जामंत्री जेनिफर ग्रॅनहोल्मएफबीआयच्या प्रमुखांनी दिलेल्या या इशार्‍यानंतर ऊर्जामंत्री ग्रॅनहोल्म यांनी अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीत या सायबर हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या शत्रूंकडे देशाची वीजसयंत्र बंद करण्याची क्षमता आहे व ऊर्जाक्षेत्राच्या सर्व आघाड्यांवर हजारो सायबर हल्ले होत आहेत, असे ग्रॅनहोल्म म्हणाल्या. या सायबर हल्ल्यांविरोधात आपल्या सर्वांची एकजूट आवश्यक असून सरकारी, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी सायबर हल्लेखोरांची खंडणीची मागणी पूर्ण करू नये, असे आवाहन ग्रॅनहोल्म यांनी केले.

अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री गिना रायमाँडो यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना, येत्या काळात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढेल, असा इशारा दिला. तसेच अमेरिकेच्या अन्न आणि इंधन क्षेत्र सायबर हल्ल्यांचे सर्वाधिक लक्ष्य असल्याची माहिती रायमाँडो यांनी दिली. हे सायबर हल्ले रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा या दोन्ही मंत्र्यांनी केला. पण अमेरिकन सिनेटर्स, जनता व माध्यमांनी बायडेन प्रशासनावर टीका सुरू केली आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेच्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही गेल्या दोन महिन्यांमध्ये या सायबर हल्ल्यांची तीव्रता काही पटींनी वाढल्याचा दावा केला जातो. बायडेन प्रशासन सायबर हल्ले रोखण्यात किंवा प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये याचे पडसाद उमटले. तर अमेरिकन सिनेटच्या चौकशी समितीतही सायबर हल्ले आणि रॅन्समवेअरच्या मुद्यांवर सिनेटर्सनी बायडेन प्रशासनाला विचारणा केली.

leave a reply